शिल्लक साठा विकण्यास परवानगी

नागपूर : दुकानातून घरोपच मद्यविक्रीला परवानगी देऊनही मागणी इतका पुरवठा होत नसल्याने शासनाने आता बारमधून (परमिट रुम) सीलबंद बाटलीतील मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी यासंदर्भातील अधिसूनचना जारी केली आहे.

शहरातील दुकानांच्या संख्येच्या दहापाट बारची संख्या आहे. हे लक्षात घेता आता ग्राहकांना दुकानांसह बारमधूनही मद्य खरेदीचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. सध्या शहरात घरपोच तर पोलीस आयुक्तालयांच्या अधिकारक्षेत्राबाहेर दुकानातून मद्यविक्री सुरू आहे. बारला (परमिट रुम)ला परवानगी नाही. बारमध्ये सीलबंद बाटलीतून मद्यविक्री होत नाही हे येथे उल्लेखनीय.

दरम्यान, घरपोच विक्रीतून गरजूंना मद्य मिळत नसल्याने शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर  सरकारने हा नवीन निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बारमध्ये ग्राहकांना सीलबंद मद्यपुरवठा केला जात नाही. मात्र आता त्यांना केवळ त्यांच्याकडील शिल्लक साठा संपवण्यासाठी हा पर्याय देण्यात आला. त्यांना एमआरपीवर  मद्यविक्री करावी लागेल, असे उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागपुरात  सरासरी वाईन व बिअर शॉपींची  सुमारे १५० दुकाने आहेत तर बारची संख्या ही एक हजारावर आहे. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी प्रत्येक बारमध्ये लाखो रुपयांचा मद्यसाठा शिल्लक होता. तो मुदतबाह्य़ ठरण्याचा धोका होता. आता त्यांना विक्रीचा पर्याय मिळाल्याने बारमालक आणि मद्यग्राहक या दोघांनाही दिलासा मिळाला आहे. हा निर्णय महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी हिरवीझेंडी दाखवल्यावरच नागपुरात लागू होणार आहे.