वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे सदस्य मिलिंद परिवक्कम यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

जंगलाला समांतर असणाऱ्या प्रकल्पाची सुरुवात करण्याआधी प्रकल्पाचे योग्य नियोजन हवे. जंगल कुठे आहे, कॉरिडॉर कुठे आहे, प्रकल्पामुळे कोणता कॉरिडॉर कापला जाणार याचा अभ्यास आधीच करायला हवा. हे माहिती असेल तर प्रकल्पाचा आराखडा तयार करणारे अभियंते वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बसून त्यावर चर्चा करतील. यामुळे प्रकल्प लवकर मार्गी लागतील आणि वन्यप्राणी देखील सुरक्षित राहतील, असे मत वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे सदस्य मिलिंद परिवक्कम यांनी व्यक्त केले. लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

परिवक्कम म्हणाले, विकास प्रकल्पांना विरोध नाहीच, पण प्रकल्पात जंगल आणि वन्यजीवांची हेंडसाळ होऊ नये. प्रकल्पाची पहिली पायरी म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल. यात रस्त्याचे डिझाईन, त्याची किंमत याचा समावेश असतो. त्यामुळे तो तयार करतानाच या सर्व गोष्टींचा विचार केला तर समस्या येणार नाहीत. कारण यातच वन्यप्राण्यांसाठी घेण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपाययोजना आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत याचा समावेश असेल. याशिवाय ज्या विभागाचा प्रकल्प आहे तो विभाग आणि वनखाते यांच्यात समस्या उद्भवणार नाही. दोन जंगलांच्या संलग्नतेला सर्वात मोठा धोका जंगलाला समांतर जाणाऱ्या (लिनिअर) प्रकल्पांचा आहे. त्यामुळे हे प्रकल्प सुरू करताना जंगल कापावे लागत असेल तर आधी वळणमार्ग काढता येईल का, हे तपासावे लागेल. तो पर्याय शक्य नसेल तर वन्यजीवांसाठी कोणत्या खबरदारीच्या उपाययोजना करता येतील, हे पाहता येईल. आता अशा प्रकल्पांसाठी मार्गदर्शक सूचना तयार झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना त्याचे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन टाळण्यासाठी त्याचे काम तुकडय़ातुकडय़ांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात येते. मनसर ते खवासा या ४९ किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण नव्हते, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचा तो एक भाग होता. अशा स्थितीत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वन्यप्राण्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना करायच्या असतील तर त्यासाठी अधिक खर्च येत असल्याचे दाखवून      टाळण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात संपूर्ण महामार्गाच्या लांबीच्या तुलनेत हा खर्च अतिशय कमी असतो. यातून वनखाते आणि तो विभाग यांच्यात वाद उद्भवतात. परिणामी, वन्यप्राण्यांना त्याचा फटका बसतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि सात ही त्याची उदाहरणे आहेत. वन्यजीवांच्या कॉरिडॉरचे महत्त्व आधीही होते आणि यापुढेही त्याचे महत्त्व अधिक राहणार आहे. कारण वन्यजीवांसाठी ते आवश्यक आहे. मेळघाट-बोर, ताडोबा-बोर, ताडोबा-घोडाझरी, घोडाझरी-उमरेड कऱ्हांडला यासारखे वन्यजीवांचे कॉरिडॉर अजूनही दुर्लक्षित आहेत. वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टने यासारखे अनेक कॉरिडॉर शोधून काढले आहेत. कॉरिडॉर कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे माहिती असायला हवे. कारण या मार्गाने वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांचा संचार सुरू असतो आणि त्याठिकाणी त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना आखता येतात.

नागझिरा-नवेगाव कॉरिडॉर खंडित

राष्ट्रीय महामार्ग क्र. सहामुळे नागझिरा-नवेगाव हा कॉरिडॉर खंडित होत आहे. नागझिरा ते कान्हा आणि नवेगाव ते ताडोबा असा कॉरिडॉर असल्याने नागझिरा-नवेगाव कॉरिडॉरला वळणमार्ग देता येणेही शक्य नाही. वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टने दहा वर्षांपूर्वीच राष्ट्रीय महामार्गाने हा कॉरिडॉर खंडित होणार हे सांगितले होते. याठिकाणी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने खबरदारीच्या उपाययोजना कराव्या, असेही सुचवले होते. तरीही त्यावेळी वनखात्याने या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी परवानगी दिली. या मार्गावरील झाडे कापून दहा वर्ष झाली, पण आजही वन्यप्राण्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. गेल्या दहा वर्षांत या महामार्गाला पूर्ण परवानगी मिळाली नसल्याने मार्गाचे काम रखडले आहे. हा कॉरिडॉर आता वन्यप्राण्यांसाठी तर सुरक्षित राहिला नाहीच, पण त्यात पैशाचा चुराडाही होत आहे.

मेळघाटचा वाघ ओरिसापर्यंत जातो

मध्यभारतातल्या लँडस्केपवर आमचे काम सुरू आहे. राजस्थानपासून सुरू झालेला या लँडस्केपमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड हे प्रदेश आहेत. या लँडस्केपमध्ये कॉरिडॉरचे प्रचंड जाळे विस्तारले आहे, ज्यामुळे वाघ एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाऊ शकतो. तांत्रिकदृष्टय़ा अभ्यास केल्यानंतर मेळघाटचा वाघ ओरिसापर्यंत, कान्हाचा वाघ मेळघाटपर्यंत तसेच नागार्जून सागपर्यंतही तो जातो. २०१० मध्ये आमचे सहकारी आदित्य जोशी यांनी केलेल्या संशोधनात ताडोबा, बोर, मेळघाट, सातपुडा, पेंच, कान्हा, नागार्जूनसागर आदी ठिकाणाहून वाघाच्या विष्ठा गोळा करून त्याचे विश्लेषण केले, तेव्हा ही संलग्नता समोर आली. जगातील सर्वाधिक वाघ भारतात असून त्यातही ५० टक्क्याहून अधिक वाघ या लँडस्केपमध्ये आहेत. त्यामुळे मध्य भारताला मिळालेली वाघांची देण वाचवायची असेल तर हे कॉरिडॉर सुरक्षित राखणे गरजेचे आहे.