X

सडकी सुपारी विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा फास

नागपूरसह मुंबईतील अनेक सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

अनेकांच्या अटकेसाठी प्रयत्न; डीआरआयचे १५ ठिकाणी छापे, ३०० टन सुपारी जप्त

इंडोनेशिया येथून आणलेल्या सडक्या सुपारीचा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध महसूल गुप्तचर संस्थेने (डीआरआय) फास आवळला असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागपूरसह मुंबईतील अनेक सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. अनेक जण फरार आहेत. काहींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

नागपुरात मोठय़ा प्रमाणात इंडोनेशियातील सडलेली सुपारी आणून ती सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीत भाजून अधिक भावाने विकली जाते. ही सुपारी आरोग्यासाठी हानिकारक असते. या व्यवसायात व्यापारी मोठय़ा प्रमाणात सीमा शुल्क बुडवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणी छापे टाकले आणि कोटय़वधींची सुपारी जप्त केली. आता डीआरआयनेही सुपारी तस्करांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डीआरआयने नागपूर व गोंदियासह पंधरा ठिकाणी छापे टाकले आणि ३०० टन सुपारी जप्त केली. त्याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये आहे. या प्रकरणात सीमा शुल्क कायद्याच्या कलम १३२ व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या गुन्ह्य़ांमध्ये ३ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. एकूण पंधरा छाप्यांमध्ये सडकी सुपारी सापडली असून व्यापाऱ्यांकडून दस्तावेजही जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत मोहम्मद रजा अब्दुल गनी तंवर रा. भावसार चौक आणि गुलाम मुस्तफा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांना जामीन नाकारण्यात आला.

मुंबईतील व्यापारी अडचणीत

सीमा शुल्क न भरता मुंबई बंदरातून सुपारी बाहेर काढणारा मुंबईतील नुरानी आणि नागपुरातील साधवानी हेही अडचणीत आले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, त्यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. नुरानीला अटक झाल्यानंतर नागपुरातील सर्व सुपारी व्यावसायिकांचे अवैध प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Outbrain