X

म्यानमार, श्रीलंका मार्गाने इंडोनेशियातून तस्करी

विदेशातून भारतात सुपारीची आयात करण्यावर मूळ किंमतीच्या १०३ टक्के सीमा शुल्क भरावा लागतो.

१०३ टक्के सीमा शुल्क बुडवण्याचा प्रकार

विदेशातून भारतात सुपारीची आयात करण्यावर मूळ किंमतीच्या १०३ टक्के सीमा शुल्क भरावा लागतो. एवढया मोठय़ा प्रमाणात विदेशी सुपारी आयात केल्यास ती महागडी ठरते. त्यामुळे नागपुरातील सुपारी विक्रेते इंडोनेशियातून स्वस्त दरात सुपारी घेऊन ती म्यानमार व श्रीलंका मार्गाने भारतात आणतात.

सुपारीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ नागपुरात आहे. येथून महाराष्ट्रासह छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड आदी राज्यांमध्ये सुपारीची विकण्यात येते. त्यामुळे नागपुरातील सातेशवर व्यापारी या व्यवसायात गुंतले आहेत. ही सुपारी इंडोनेशिया येथून तस्करी करवून तिला नागपुरात सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीत भाजण्यात येते. त्यानंतर त्याची विक्री केली जाते. यात मोठय़ा प्रमाणात सरकारचा महसूल बुडवला जातो. त्यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली असता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेतली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग व महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नागपूर व विदर्भातील सुपारी व्यापाऱ्यांवर कारवाई केली. डीआरआयने आतापर्यंत पंधरा ठिकाणी छापे टाकून ३०० टन सडलेली सुपारी जप्त केली. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात धक्कादायक माहिती समोर आली.

सुपारी तस्करीचे मार्ग

इंडोनेशियातून निघालेल्या सुपारीची सिंगापूर-थायलॅंड, म्यानमार, मनिपूर- सिलचर-गुवाहाटी आणि नागपूर या मार्गाने तस्करी करण्यात येते. त्याशिवाय सिंगापूर-म्यानमार-श्रीलंका-मुंबई-नागपूर या मार्गाचाही वापर करण्यात येतो. सुपारी तस्करीसाठी समुद्रमार्ग व भारतात रस्ते मार्गाचा वापर करण्यात येतो.

श्रीलंकेत साठवली जाते सुपारी

श्रीलंकेच्या मातीत उत्पादन घेतलेल्या वस्तूंवर भारतात सीमा शुल्क लागत नाही. त्यामुळे नागपुरातील तस्कर इंडोनेशियाची सुपारी म्यानमारवरून समुद्रमार्गे श्रीलंकेत नेतात आणि त्या ठिकाणी सुपारी अनेक दिवस साठवून ठेवली जाते. त्यानंतर ती सुपारी श्रीलंका निर्मित असल्याचे दाखवून भारतात आणण्यात येते. मात्र, नागपूर व गोंदियात सापडलेली शेकडो टन सुपारीच्या दस्तावेजावरून हा गोरखधंदा समोर आला.

सीमेवर सुपारी सोडविण्यासाठी विशेष तस्कर

म्यानमार सीमेवरुन भारताच्या सिमेपर्यंत सुपारी पोहोचवण्याची जबाबदारी म्यानमारमधील तस्कर अब्दुल हबीब याच्याकडे आहे. त्यानंतर मिझोरममार्गे सुपारी भारतात दाखल झाल्यानंतर ती नागपूपर्यंत पोहोचविण्यासाठी मच्छुवानी भाई हा काम करतो. तर श्रीलंकेतून मुंबई बंदरात येणारी सुपारी सोडवून ती नागपूरकरिता रवाना करण्याचे काम नुरानी याच्याकडे आहे. इंडोनेशियातून भारतात तस्करी होणारी बहुतांश सुपारी सिंगापूर येथील अप्लाईड लॉजिस्टीक कंपनी, सू. चू. कंपनी (पीटीई) आणि एम.एम. ट्रेडिंग कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून येते, हे विशेष. ही सर्व माहिती डीआरआयच्या चौकशीदरम्यान समोर आली आहे.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain