मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भाजपवर टीका

भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकारने सर्वच वयोगटातील नागरिकांना बँक खात्यात १५ लाख, डिजिटल इंडिया, मेक इन इंडियासह इतरही पोकळ आश्वासने दिली. तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात दोनही सरकारच्या नाकर्तेपणामुळे तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. हा  विश्वासघात आहे, असा घणाघात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला.

सावनेरचे  काँग्रेस उमेदवार सुनील केदार यांच्या प्रचारासाठी कमलनाथ यांनी गुरुवारी भानेगाव नवीन बिना बाजार येथे सभा घेतली. त्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कमलनाथ म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव, कर्जमाफीसह इतरही अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात  शेतकरी, कष्टकऱ्यांना कोणता लाभ दिला हे दोन्ही सरकार सांगत नाही. हे सरकार खोटे बोलते व मूळ मुद्यावरून नागरिकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी प्रचारात पुलवामा, धारा ३७० आदी मुद्यांचा वापर करते. ही जनतेची दिशाभूल आहे.

मंदीमुळे हजारो नागरिकांचे रोजगार जात आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकार  कोणतेही उपाय न करता केवळ राजकारण करीत आहे. देशात वेकोलिसह इतरही कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी

वेकोलिचे राष्ट्रीयीकरण केले होते. मात्र, आता या सरकारने या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे.

सुनील केदार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर १ नोव्हेंबरला खापरखेडा वीज केंद्रापुढे बेरोजगारीच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची घोषणा  केली. यावेळी व्यासपीठावर परासियाचे (म.प्र)आमदार सोहम वाल्मीकी, रिपब्लिकन पक्षाचे नेते पृथ्वीराज बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर चौधरी, सरपंच रवींद्र चिखले, पुरुषोत्तम चांदेकर, आशीष उपासे, वंदना ढगे, नारायण उपासे, अनेस चवरे  उपस्थित होते.