कारवाई होत नसल्याने आश्चर्य

नागपूर : आजवर शहराला कितीतरी पोलीस आयुक्त लाभले, मात्र पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे सुरू असलेले बाल्या बिनेकर व जागो दिवटेच्या जुगार अड्डय़ांवर कुणीच कारवाई करण्याची हिंमत दाखवू शकले नाही. एकीकडे शहरातील सर्व जुगार अड्डय़ांवर कारवाई होत असताना या जुगार अड्डय़ांवर आशीर्वाद कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाल्या ऊर्फ किशोर एकनाथ बिनेकर आणि जागो दिवटे यांचे दोन वेगवेगळे जुगार अड्डे आहेत. ते इतवारी परिसरातील व्यापाऱ्यांना जुगाराची सेवा पुरवतात. बाल्या व जागो हे इतवारी, महाल परिसरातून टाटा सुमोने लोक जुगार अड्डय़ावर घेऊन जातात. कधी घरात तर कधी रेल्वे लाईन परिसरात ते जुगार भरवतात. बुधवार व शुक्रवारी येथे गर्दी असते.  या अड्डय़ांसंदर्भात पाचपावली पोलीस ठाण्यातील शिपाई राज व दीपक यांना सर्व माहिती आहे. मात्र, ठाणे त्यांच्या तालावर नाचत असल्याने कधीच कारवाई झाली नाही.

अशी ही बनवाबनवी

बाल्या बिनेकर व जागो दिवटे यांच्याकडे रमी क्लबचा परवाना आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकत नाही, अशी बनवाबनवी करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जाते. मात्र, बिनेकरकडे रमी क्लबचा परवाना नाही. तर जागो हा रमी क्लबच्या नावाखाली ‘रनिंग चेंगड’, ‘तीन पत्ती’ स्वरूपाचा जुगार भरवतो. काही दिवसांपूर्वी अशाच जुगार अड्डय़ावर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी कारवाई केली होती. त्यामुळे जागो व बिनेकर यांच्यावर कधी कारवाई होईल, असा सवाल आता पोलीस वर्तुळातच विचारू लागले आहेत.

स्थानिक नगरसेवकही भागीदार

बाल्या बिनेकर याच्या जुगार अड्डय़ात स्थानिक नगरसेवक व जरीपटक्यातील तुलसी हे भागीदार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बाल्याच्या जुगार अड्डय़ावर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय बळाचा वापर करण्यात येते. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम हे या जुगार अड्डय़ांवर कारवाई करणार का, असा सवाल करण्यात येत आहे.

अवैध धंदे बंद करू

कोणत्याही स्वरूपाचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. अशाप्रकारचे अवैध धंदे कुठे चालत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणाचीही गैर केली जाणार नाही.

– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.