सामाजिक उपक्रमात सहभाग

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या विदर्भातील राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील शिष्यांना धक्का बसला. बडय़ा राजकीय नेत्यांसोबत असलेली जवळिक यामुळे विदर्भात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.

राज्यात राजवट काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची असो किंवा भाजपच्या नेतृत्वातील विद्यमान युती सरकारची, भय्यूजी महाराजांचे महत्त्व कायम होते. त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांमुळे नागपूरसह विदर्भातील विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या संपर्कात होते. त्यात वैद्यकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांचा समावेश होता. राजकीय  क्षेत्रापुरते नमूद करायचे झाल्यास विदर्भातील काँग्रेस नेते व विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, भाजपचे विद्यमान आमदार अनिल सोले यांच्यासह इतरही नेते नेहमी भय्यूजी महाराजांना भेटण्यासाठी  इंदूरला जात. नागपुरात आल्यावरही ते त्यांची आवर्जून भेट घेत असत. माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव संजय देशमुख हे यवतमाळ येथे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या घरी त्यांनी भेट दिली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भय्यूजींच्या इंदोर येथील आश्रमाला २०१६ मध्ये भेट दिली होती. भय्यूजी महाराजांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध होते. नागपूरला आल्यावर ते संघ मुख्यालयाला भेट देत असत.

विदर्भातील खामगाव येथे त्यांचा आश्रम आहे. तेथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. के.एम. थानवी यांचे ते स्नेही होते. त्यांच्याकडून ते औषध घ्यायचे. भय्यूजी महाराजांनी त्यांच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांना जोडले होते. येथील डॉ. सजय उगेमुगे यांच्या वृद्धाश्रमाला त्यांनी २०१३ मध्ये दोनवेळा भेटी दिल्या होत्या. काँग्रेसचे माजी आमदार किशोर काशीकर यांचे ते स्नेही होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा श्रीनिवास याला त्यांनी आधार दिला.

भय्यूजींच्या सान्निध्यात त्याने अनेक वर्षे घालवली. गुजरातमधील संतनगरी या प्रकल्पाची जबाबदारी ते सध्या सांभाळत आहेत.

अलीकडच्या काळात नागपुरात आल्यावर भय्यूजींचा मुक्काम रामनगर येथील संदीप देशमुख यांच्या घरी असायचा. महालमधील गुजरवाडय़ातही ते अनेक वेळा आले. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त कळताचअनेक जण इंदोरकडे रवाना झाले आहेत.