कळमना बाजार समितीत शेतमाल न आणण्याचे आवाहन

नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी मंगळवार, ८ डिसेंबरला पुकारलेल्या बंदला विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. बंद असल्याने मंगळवारी शेतकऱ्यांनी कळमना बाजार समितीत शेतमाल विकण्यास आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयटकने या बंदला पाठिंबा जाहीर करताना केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. आयटक कामगार संघटना राज्यभर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे निदर्शने करणार आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन आयटकचे प्रदेश अध्यक्ष सी.एन. देशमुख व सरचिटणीस श्याम काळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय घरेलू व असंघटित कामगार फेडरेशनचे (इंटक) कार्यकारी अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिले असून त्यात केंद्र शासनाच्या कृषी धोरणाचा निषेध केला आहे. देशातील विविध कामगार संघटनांनीही या बंदला समर्थन जाहीर केले असून त्यात आईएनटीयू, सिटू, एचएमएस, टीयूसीसी, सीईडब्ल्यूए, एलपीएफसह इतरही संघटनांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.जी. संजीव रेड्डी यांनी इंटकच्या सर्व प्रदेश व जिल्हा शाखांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले आहे.

सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियानेही बंदला समर्थन जाहीर केले आहे. सामूहिक बाजार व्यापारी संघटनेने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी कळमना बाजार समितीत माल आणू नये, असे आवाहन या संघटनेने केले आहे. दिल्लीच्या सीमेवर आपल्या न्याय्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर  पाण्याचा मारा करणाऱ्या केंद्र सरकारचा संघटनेने निषेध केला आहे.

शिवसेनेचाही सहभाग – खासदार तुमाने

शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये  जिल्’ातील सर्व शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केले आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेनेने शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.  शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांच्यासह युवासेना, महिला सेना, वाहतूक सेना यांनीही उत्स्फूर्तपणे बंद पाळावा व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन केले आहे.

काँग्रेस, बसपाचाही पाठिंबा

तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणि मंगळवारच्या भारत बंदच्या आवाहनाला काँग्रेस पक्ष आणि बसपाने पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर शहर जिल्हा काँग्रेसने प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांनी सहाही विधानसभानिहाय आपापल्या ब्लॉकमध्ये बाजार, मोहल्ला, चौकातील दुकाने बंद करून भारत बंद यशस्वी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना चर्चेला बोलावले, पण एकही मागणी मान्य न करता शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यामुळे बसपाने भारत बंदचे आवाहन केले असून बसपा त्याला समर्थन देत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आज आटोरिक्षा बंद ठेवण्याची घोषणा

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला नागपुरातील टायगर ऑटोरिक्षा संघटनेनेही समर्थन दिले आहे. शेतकऱ्यांच्या मंगळवारी संपाच्या दिवशी ऑटोरिक्षाही बंद ठेवण्याची घोषणा संघटनेकडून सोमवारी करण्यात आल्याने जिल्ह्य़ातील प्रवाशांचा मन:स्ताप वाढण्याची शक्यता आहे. संघटनेचे महासचिव प्रकाश साखरे म्हणाले की, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या शांततापूर्ण आंदोलनावर सरकारने पोलिसांच्या माध्यमातून पाण्याचा मारा करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. त्यासाठी प्रत्येक ऑटोरिक्षाच्या मागे  ८ डिसेंबरला ऑटोरिक्षा बंद राहणार असल्याचे प्रवाशांच्या माहितीसाठी लिहून ठेवण्यात आल्याचेही सारखे यांनी  सांगितले. संविधानाने प्रत्येकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु केंद्र सरकार या आंदोलनाला चिरडून त्यांच्या अधिकारावरही गदा आणत आहे. या सर्व शेतकऱ्यांची नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी योग्य असून ती मागणी मंजूर न झाल्यास पुढे ऑटोरिक्षा चालक आणखी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी दिला. दरम्यान, शहरात ऑटोरिक्षा बंद राहिल्यास सर्वसामान्यांना मन:स्ताप होण्याची शक्यता आहे.

नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचा बंदला विरोध

नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सने बंदला विरोध केला असून चेम्बर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी स्पष्ट केले की करोना काळात टाळेबंदीमुळे आधीच व्यापारी आíथकदृष्टय़ा खचले आहेत. त्यात परत एक दिवसाचा बंद आम्हाला परवडणारा नाही. त्यामुळे आज बाजारपेठा नियमित सुरू राहतील.  विशेष म्हणजे, याच व्यापाऱ्यांनी १९ ऑगस्ट रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त तुकराम मुंढे यांनी काढलेल्या व्यापाऱ्यांच्या परवाना सक्तीच्या निर्णयाविरोधात करत १९ ऑगस्ट रोजी एक दिवसांचा बंद पुकारला होता. मात्र आता शेतकरी अडचणीत असताना त्यांनी स्वार्थ दाखवत बंदला विरोध केला आहे. केवळ मागण्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

‘आप’ची स्वाक्षरी मोहीम

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रविवारी स्वाक्षरी मोहीम राबवली.  जयताळा बाजारा, माटे चौक आणि शहरातील इतरही भागांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी घेण्यात आल्या. लोकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. ही मोहीम आपचे अमोल हाडके यांच्या नेतृत्वात बुलू बेहरा, संदीप पोटपिटे, अमित पिसे, अजय धर्मे, विनोद अलम दोहकर यांनी राबवली. दरम्यान मंगळवारच्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे.

कळमना धान्यगंज आडतिया मंडळाचा पािठबा

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला कळमना धान्यगंज आडतिया मंडळाने पािठबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केल्याने आम्हीही कळमना बाजार कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कळमना धान्यगंज आडतिया मंडळाने पत्रकाद्वारे कळवले आहे.