ती आली.. उगीमुगी बसली.. अगदी शेवटी बोलायला उठली अन् स्पर्धा जिंकली. परीक्षकांनी ती विजेती असल्याचे जाहीर करण्यापूर्वीच तिच्या विजेतेपदावर इतर स्पर्धकांनीच शिक्कामोर्तब केले. ही गोष्ट आहे ‘वक्ता दशसहस्रेषु’ या लोकसत्ताच्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत नागपूर विभागाच्या अंतिम फेरीतून विजेत्या ठरलेल्या मॉरिस महाविद्यालयाच्या भुवनेश्वरी परशुरामकर या विद्यार्थिनीची. पात्र ठरलेल्या १२ स्पर्धकांपैकी ९ स्पर्धक उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निकालस महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा सोमलवार आणि प्राथमिक फेरीचे परीक्षक अनंत ढोले होते. समारोपीय कार्यक्रमात स्पर्धेच्या परीक्षक ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्यासह व्यासपीठावर मोहता विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चरलवार, परीक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे आणि प्रकाशक सोनाली कोलारकर, विदर्भ आवृत्तीचे ब्युरो चिफ देवेंद्र गावंडे आणि वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे उपस्थित होते.
यावेळी अरुणा ढेरे यांनी, तुमच्यातील क्षमता ओळखून भाषेवर प्रेम करायला शिका, असे आवाहन केले. वक्तृत्व म्हणजे, पाठांतर नसून तो हृदयसंवाद आहे, या शब्दात वक्तृत्वाची महती सांगितली.
एलएडीची श्रीनिधी देशमुख आणि शर्वरी पेटकर, वध्र्याच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयाचा अमित मुडे, खामल्याच्या निकालस महिला महाविद्यालयाची शिवानी पांडे, मॉरिस कॉलेजची भुवनेश्वरी
परशुरामकर, धरमपेठेतील तारकुंडे धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालय समर्थ रागीट, रायसोनी विधि महाविद्यालयाचा अक्षय जोशी आणि नागपूर विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाचा डॉ. सुजित कुंभलकर या विद्यार्थी स्पर्धकांचा समावेश होता. विनोबा विचार केंद्रात निवडक स्पर्धकांसोबत ही स्पर्धा रंगली.
‘जनता सहकारी बँक पुणे’ व ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या स्पर्धेस सिंहगड इन्स्टिटय़ुट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑईल, इन्स्टिटय़ुट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अर्थात, आयसीडी यांचे सहकार्य लाभले.
तसेच युनिक अ‍ॅकेडमी आणि स्टडी सर्कल स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. संचालन ज्ञानेश्वर महाले यांनी केले.

विभागीय अंतिम फेरीचा निकाल
प्रथम क्रमांक- भुवनेश्वरी परशुरामकर
द्वितीय क्रमांक- श्रीनिधी देशमुख
तृतीय क्रमांक- अमित मुडे
उत्तेजनार्थ- शर्वरी पेठकर आणि सुजीत कुंभलकर