24 September 2020

News Flash

सायकिलगकडे वाढता ‘कल’

गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी सायकिलगने पुन्हा नव्याने जन्म घेतला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आरोग्याच्या दृष्टीने शहरात शेकडो ग्रुप स्थापन

पूर्वी सायकल चालवणं हा एक वेगळा थाट असायचा, परंतु मोटारसायकलने जीवनात शिरकाव केला अन् सायकल मागे पडू लागली. पण तीच सायकल पुन्हा ताठ मानेने आयुष्यात आली ती फिजिकल फिटनेसमुळे. आता सायकल चालवणं हा एक छंद असला तरी तिच्याही कम्युनिटीज नागपुरात तयार झाल्या आहेत.
गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी सायकिलगने पुन्हा नव्याने जन्म घेतला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आरोग्यासाठी लाभदायक ठरणारी सायकल आता अनेकांच्या घरात दिसू लागली आहे. नागपुरात सायकलचे विविध ग्रुप झाले असून ते आरोग्याच्या दृष्टीने नियमितपणे सायकल घेऊन फिरायला जातात. पूर्वी ग्रामीण भागात किंवा शहरी भागातही आजकाल जेवढय़ा सहजतेने वाहनकर्ज उपलब्ध आहेत, तेवढी नव्हती आणि एखादी गाडी घेणं हे सामान्य माणसाला परवडणारे देखील नव्हते. ज्यांच्या घरी सुबत्ता आहे, भरपूर पसा आहे असाच माणूस गाडी घेण्याचे धाडस करू शकायचा. मात्र सामान्य माणूस सायकलवर समाधान मानायचा. ज्या पटीत गाडय़ांचे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले त्याच पटीत माणसामधील आळसपणा वाढत गेला. अगदी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर काही आणायला जायचे असेल तरी वाहनाशिवाय बऱ्याच लोकांचे पान हलत नाही. घरात वाहन असणे मुळीच वाईट नाही, किंबहुना ती काळाची गरज आहे, परंतु वाहनाचा वापर किती आणि कसा करायचा यावर आपले सुटत चाललेले नियंत्रण नक्कीच वाईट आहे. आनंदाची गोष्ट अशी की, अजूनही काही मंडळी अशी आहेत जी सायकलवर प्रेम करतात, जाणूनबुजून सायकलचा वापर जास्त करतात, पण बऱ्याच मंडळींना सायकिलग करण्याचे फायदे कळूनही आणि पटत असूनही ते सायकल वापरायचे टाळतात. कारण काय तर आपल्याकडे गाडी घेण्याएवढा पसा असताना सायकल वापरली तर लोक काय म्हणतील? आणि हे खरेही आहे. अशी सुरुवात आणि प्रयत्न करू पाहणाऱ्यांना हसून त्यांचा उत्साह नाहीसा करणाऱ्यांचीही कमी नाही, पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्याएवढे मानसिक बळ ज्यांच्याकडे आहे त्यांना काहीच अडचण नाही. तर घ्या मग सायकल अन् टका एक पाऊल उत्तम आरोग्याकडे.
सायकिलगचे फायदे
खरे पाहता सायकल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालवणे हा एक सर्वागसुंदर व्यायाम प्रकार आहे. सायकिलगमुळे गुडघा, दोन्ही पाय, पाठीचा कणा, खांदा, दोन्ही हात, पाठ या अवयवांना व्यायाम मिळतो. सायकलमुळे हवा, ध्वनी यापकी कोणतेही प्रदूषण होत नाही. सायकलला इंधन काहीच लागत नाही. त्यामुळे मेंटेनन्सचा अगदी अवघा खर्च सोडल्यास सायकलने प्रवास करणाऱ्यांना विशेष खर्च येत नाही. ‘ट्रॅफिक जाम’ ही समस्या सायकलस्वारांवर येत नाही. नियमित किमान १० ते २० कि.मी. अंतर सायकलीने पार केल्यास तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शिवाय पचनक्रिया, भूक लागणे, सहनशक्ती, शरीर बळकट होण्यास मदत होते.
नागपुरात व्हावा सायकिलग ट्रॅक
उपराजधानीत जवळपास १०० च्या वर छोटे-मोठे सायकिलगचे ग्रुप आहेत. यात सर्व वयोगटातील मंडळींचा समावेश असून ते दररोज सकाळी शहराच्या बाहेर नियमित सायकिलगला जातात. ठरलेल्या जागेवर सकाळी एकत्र जमा व्हायचे आणि एकत्र सोबत निघायचे हा त्यांचा दैनंदिन उपक्रम असतो. कोणी फुटाळ्यापासून अमरावती मार्ग तर कोणी छत्रपती चौक ते वर्धा मार्गाने मिहानच्या परिसरात सायकिलगला जातात. मात्र महामार्गाने जात असताना जड वाहनांचा सामना त्यांना करावा लागतो. अशात अपघात होण्याची शक्यता असते. लहान मुले असल्यास विशेष खबरदारी घ्यावी लागते. अशात सुरक्षित प्रवास व्हावा या उद्देशाने शहरात सायकल ट्रॅकची मागणी विविध सायकिलग ग्रुपने केली आहे. असे झाल्यास मुलांची आवड व ओढा सायकिलगकडे वाढेल अन् प्रवासही सुरक्षित होईल असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अध्याप नागपुरात सर्वजनिक असा एकही सायकल ट्रॅक नाही. केवळ गोरेवाडा येथे एक ट्रॅक नुकताच करण्यात आला, मात्र तो शहराच्या एका टोकावर असल्याने त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. शहरात जेथे नागपूर सुधार प्रन्यासची उद्याने आहेत तेथे सायकल ट्रॅक व्हावा, अशी मागणी सायकल प्रेमींकडून होत आहे.
सायकलने टाकली कात
पूर्वी सायकल म्हटलं की दणकट काळी ‘वाण्याची’ किंवा रंगीत नाजूक ‘रेसर’ मॅक वन सायकल. त्यात लेडिज आणि जेन्टस् यापलीकडे काहीच नसे. बोटावर मोजण्याएवढय़ा सायकल कंपन्या होत्या. रेली, हक्र्युलस, अ‍ॅटलास, हिरो, व्हीएसीए या सर्वाची फ्रेम एकच डिझाईनची असे. त्याकाळी सायकल सगळेच वाहन म्हणून वापरत असत. एखादी कंपनी सुटली की किमान १०० सायकलींचा ताफा एकत्र बाहेर पडत असे. मात्र सध्या सायकलचा काळ बदलला व सायकल ही फिटनेससाठी वापरली जात आहे. ही एक आनंदाची गोष्ट असली तरी अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता आज देखील आहे. वाहनांमध्ये जशी टेक्नालॉजी आली, तशी सायकलही अत्याधुनिक झाली. आता सायकल फक्त जवळच्या पल्ल्यांसाठी किंवा गरीब माणसाचे वाहन उरलेली नाही. अनेकांची हौस आणि मजेची वस्तूही बनली आहे. वेगवेगळ्या वापरासाठी वेगवेगळे डिझाईन, जाड, दणकट, बारीक, हलके, बुटके, उंच अशा सर्व प्रकारच्या विशिष्ट धातूत बनवलेल्या फ्रेम्स त्याचप्रमाणे त्यांचे टायर बनू लागले. सायकल चालवण्यास सोपी व्हावी म्हणून त्यात गेअरही देण्यात आले. ७ गेअर ते २४ गेअरच्या सायकली अगदी कॉमन झाल्या आहेत. नागपुरात असंख्य छोटे-मोठे सायकल ग्रुप असून दररोज ही मंडळी राईडला निघते. सुटीच्या दिवशी ही मंडळी २०-२५ च्या ग्रुपमध्ये सायकिलग करायला बाहेर पडू लागले आहे. महागडय़ा सायकल व विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज लावून ही मंडळी सॉलिड फिरायला निघतात. या सायकिलगमध्ये हौस, मजा व फिजिकल फिटनेस दोन्ही गोष्टी पूर्ण होतात. ग्रुपमध्ये डॉक्टर्स, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, निवृत्त शासकीय अधिकारी सोबतच अनेक वयोगटातील लोकांचा समावेश असल्याने विचारांची देवाण-घेवाण देखील होते. तब्बल २० हजारांपासून तर दोन लाखांपर्यंत किमतीच्या सायकली आज बाजारात उपलब्ध आहेत. विदेशी कंपन्यांच्या या सायकली केवळ आरामदायकच नाही तर आरोग्यासाठी लाभदायक देखील आहेत. विशेष बनावटीमुळे शेकडो किलोमीटरचे अंतर सहज पार केले जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:05 am

Web Title: bicycle trend
Next Stories
1 महापालिकेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकही गुच्छ घेऊन वाडय़ावर
2 भूखंड नियमितीकरणाचा तिढा कायम
3 अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये बंद पडण्याचा सपाटा
Just Now!
X