ज्योती तिरपुडे

बालरक्षकांच्या प्रयत्नांना मोठे यश

भीक मागणाऱ्या मुलांना सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळांनी नाकारले. मात्र, बालरक्षकाच्या प्रयत्नांमुळे एका खासगी शाळेने या मुलांना जवळ केले. आज ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली असून त्यांनी भीक मागणे सोडले आहे.

खापरखेडय़ाच्या ‘अण्णामोड’ चौरस्ता येथे मांग-गारुडी समाजातील दोन मुले आणि दोन महिला दुपारी भीक मागताना बालरक्षक प्रसेनजीत गायकवाड यांना दिसली. चिकित्सक बुद्धीने त्यांनी विचारपूस केली. सायंकाळी ते राहत असलेल्या पालावर गेले असता शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या या मुलांची विदारक कथा समोर आली. त्या अण्णामोड चौररस्त्याच्या जवळच असलेल्या त्यांच्या पालावर सहा-सात झोपडे होते. पहिलीपासून ते सातवीपर्यंत शाळेत जाऊ शकतील, अशी १२ मुले होती. अंगणवाडीत जाणारी वेगळी, तान्ही मुले आणखी वेगळी.

या मुलांना त्यांच्या शाळेविषयी विचारले असता काही मुले कन्हानच्या शाळेत दाखल होती. काही जवळच्या शाळेत दाखल असली तरी प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिक्षण कोणीच घेत नव्हते. बालरक्षकाने केलेल्या चौकशीअंती पाच सात वर्षांपासून ती कुटुंबे त्याच भागात राहतात. पुरुषांनी कोंबडी सोलणे, बांधकाम क्षेत्रात किंवा इतर स्थायी प्रकारची कामे शोधली आहेत. महिला लहान मुलांना घेऊन भीक मागणे किंवा भंगार वेचण्याची कामे करतात. ते राहत असलेल्या पालाजवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी या १२ मुलांना शाळेत घेण्यास साफ  नकार दिला. त्यामुळे जयभोले नगर, चानकापुरातील खासगी व्यवस्थापनाच्या महात्मा फुले उच्च प्राथमिक शाळेत या मुलांना दाखल करण्यात आले. या शैक्षणिक वर्षांत मुलांना शाळेची गोडी लागली असून मुले नेटाने अभ्यासाला लागली आहेत. कुणी पहिलीत, कुणी तिसरीत, सहावीत तर कोणी सातवीत दाखल होऊन अभ्यास करीत आहे. या मुलांनी भीक मागणे आणि भटकणे सोडले आहे.

या मुलांना गवसली शिक्षणाची वाट

रीदिमा इकबाल शेंडे आणि निहाल मनीष कांबळे (तिसरी), संदीप नंदलाल रागपसरे आणि सोईद मनीष कांबळे (सातवी), सोयल मनीष कांबळे आणि रणवीर रवि खडसे (पाचवी), आचल देवीदास कांबळे आणि चंदा सत्यपाल कांबळे (चौथी), वीर रवि खडसे (दुसरी), जान्हवी मित्तल पात्रे, रोहिणी मित्तल पात्रे आणि आविश मनीष कांबळे.

जयभोले नगरपासून दोन शाळा या मुलांच्या पालांपासून जवळच आहेत. ही सर्व मुले भीक मागत होती. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी या मुलांना शाळेत दाखल करून घेण्यास नकार दिला. मुख्याध्यापकांना ही मुले कटकट वाटत असावी. पालकांनाही आरटीईची माहिती नव्हती.  शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हेच आरटीईचे एकमेव ध्येय आहे. ही बारा मुले आज व्यवस्थित शिक्षण घेत आहेत.

– प्रसेनजीत गायकवाड, बालरक्षक, जिल्हा परिषद