13 August 2020

News Flash

एप्रिलपासूनच्या वीज दरवाढीचा सर्वाधिक फटका गरिबांना!

३० युनिट वापर असलेल्यांचे देयक १७ टक्क्यांनी वाढले

संग्रहित छायाचित्र

महेश बोकडे

टाळेबंदीच्या काळात महावितरणच्या ग्राहकांचे वीज देयक वाढण्यास १ एप्रिल २०२० पासून झालेली दरवाढ हे एक प्रमुख कारण आहे. त्यानुसार विजेच्या स्थिर आकारासह इतर संवर्गातील दरवाढीने १०० युनिटच्या खालील घरगुती वीज वापर असलेल्यांना सर्वाधिक फटका बसला. तब्बल १७ टक्के दरवाढ ही ३० युनिटच्या खाली वीज वापर असलेल्या गरिबांच्या देयकात झाली आहे.

मागच्या सरकारच्या काळात महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर झाला  होता. सत्तांतरानंतर वीज नियामक आयोगाने राज्यातील विविध ठिकाणी जनसुनावणी घेत १ एप्रिल २०२० पासूनची दरवाढ जाहीर केली. त्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि वीज नियामक आयोगाने ही दरवाढ अत्यल्प असल्याचा दावा केला होता. परंतु आयोगाने मंजूर केलेल्या वाढीव स्थिर आकारासह इतर दरवाढ मिळून सर्वाधिक विजेचे दर १०० युनिटच्या खाली वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वाढल्याचे आता स्पष्ट होत आहे.

मार्च-२०२० मध्ये घरगुती ग्राहकांचा स्थिर आकार ९० रुपये होता. एप्रिल-२०२० पासून तो ११० रुपये झाला. दरम्यान, ३० युनिट वीज वापर असलेल्यांना मार्च-२०२० मध्ये इंधन समायोजन आकार वगळून स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क असे २५५.०८ रुपये मासिक देयक येत होते. परंतु १ एप्रिलच्या दरवाढीनंतर ते १७.०१ टक्क्यांनी वाढून (४३.३८ रुपये) २९८.४७ रुपये झाले. १०० युनिट वापर असलेल्यांना मार्चमध्ये ६०६.६८ रुपये देयक येत होते. ते १४.९१ टक्क्यांनी वाढून ६९७.१६ रुपयांवर (१०.६२ टक्के वाढ) गेले आहे. २०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांना पूर्वी १,५६१.३६ रुपये देयक येत होते. ते आता १०.६२ टक्यांनी वाढून १,७२७.२४ रुपयांवर गेले आहे. ३०० युनिटच्या ग्राहकांना पूर्वी २,५१६.०४ रुपये देयक येत होते. ते ९.५९ टक्क्यांनी वाढून २,७५७.३२ रुपयांवर गेले आहे. ५०० युनिटच्या ग्राहकांना पूर्वी ५,१०९.८० रुपये देयक येत होते. ते आता ७.४० टक्क्यांनी वाढून ५,४८७.९६ रुपयांवर गेले आहे. या दरवाढीत इंधन समायोजन आकार अतिरिक्त आहे, हे विशेष.

५८ लाख ग्राहक.. : राज्यात महावितरणचे सर्वच संवर्गातील एकूण २.६० कोटी वीज ग्राहक आहेत. त्यातील भिवंडी वगळून सुमारे २ कोटी ग्राहक घरगुती संवर्गातील आहेत. यापैकी ५८ लाख घरगुती ग्राहक महिन्याला ३० युनिटच्या खाली तर दीड कोटी ग्राहक १०० युनिटच्या खाली वीज वापर करतात. दीड कोटी ग्राहकांत ३० युनिटच्या खालील ५८ लाख ग्राहकांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यातील गरीब व सामान्य कुटुंबातील ग्राहकांनाच सर्वाधिक वीज दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या घरगुती संवर्गातील ग्राहकांचे वीज देयक एप्रिल-२०२० पासून १.१६ टक्के ते १७.०१ टक्केपर्यंत वाढले आहेत. सर्वाधिक दरवाढ १०० युनिटच्या खाली वीज वापर असलेल्यांची आहे. परंतु प्रत्यक्षात आयोगाला मागितलेल्या दरवाढीच्या तुलनेत ही वाढ कमी आहे.

– महेंद्र जिचकार, वीजतज्ज्ञ, नागपूर

टाळेबंदीत सगळेच घरात अडकून पडले होते. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत उन्हाळ्यात कुलर, वातानुकूलित यंत्रासह इतरही वीज यंत्रांचा वापर वाढला. एप्रिलमध्ये थोडय़ा प्रमाणात दरवाढही आयोगाच्या मंजुरीने झाली होती. दरम्यान, महावितरणने सामाजिक बांधीलकी जपत कुणाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. ग्राहकांनीही वीज देयक समजून घेण्याची गरज असून प्रत्येकाला प्रत्यक्ष वापराचेच देयक दिले आहेत.

– अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 12:15 am

Web Title: biggest hit since april has been the poor of electricity tariff abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नागपुरी संत्र्यांचा चीनप्रवास थांबला
2 पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षाही होणार!
3 ‘गट अ’ पदावर असतानाही पुन्हा परीक्षा दिल्याने इतरांना फटका
Just Now!
X