रोडरोमियोंवर संशय, अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनींनी रस्त्याने जाणाऱ्या काही असामाजिक तत्त्वांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. बुधवारी  रात्री २ च्या सुमारास येथील १० विद्यार्थिनींच्या दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार पुढे आला. हे कृत्य याच रोडरोमियोंनी केल्याचा आरोप करुन विद्यार्थिनींनी अधिष्ठाता कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जोरदार आंदोलन केले. विद्यार्थिनी संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

नागपूरच्या मेडिकलमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी वैद्यकीयच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरिता येतात. येथे मुले व मुलींच्या राहण्याकरिता स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था आहे.

शिक्षणाच्या काळात या सगळ्या मुलींचे पालकत्व मेडिकल प्रशासनाकडे असते. परंतु प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांकडे फारसे लक्षच दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडूनच होत आहे. मेडिकलच्या विद्यार्थीनिंकडून रोडरोमियोंकडून होणारा त्रास थांबवण्याकरिता मेडिकल प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून कारवाईची विनंती केली होती.

मेडिकल प्रशासनाने त्यावरून अजनी पोलिसांना या भागात सुरक्षा वाढवण्यासह पोलिसांची गस्त वाढवण्याची विनंती केली. परंतु पुढे हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. त्यातच बुधवारी रात्री २ च्या सुमारास मेडिकलच्या वसतिगृह क्रमांक २ च्या वाहनतळावर दुचाकी वाहनांना आग लागल्याचा प्रकार पुढे आला. वसतिगृहीतील विद्यार्थिनींनी लगेच बाहेर येवून आरडा- ओरड सुरू केली. सुरक्षारक्षकाला एका वाहनाला आग लागलेली दिसताच प्रथम त्याने ती विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर त्याने मोबाईलहून अग्निशमन दलाला दूरध्वनी लावण्याचा प्रयत्न केला. त्यातही यश न मिळाल्यावर त्याने ट्रामा केयर सेंटरच्या दिशेने पळत जात दुसऱ्या सुरक्षारक्षकाला सूचना दिली. येथून अग्निशामन दलाशी संपर्क साधण्यात आला.

अग्निशमन दलाच्या गाडय़ांनी त्वरित घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तत्पूर्वी येथील विद्याथीनींच्या ९ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. त्यात ५ मोपेड संवर्गातील वाहनांचा समावेश होता. हा प्रकार छेडखानी करणाऱ्यांनीच केल्याचा संशय व्यक्त करीत संतप्त विद्यार्थीनिंनी दुपारी ११ ते १ च्या दरम्यान अधिष्ठाता कार्यालय गाठत जोरदार आंदोलन केले. अधिष्ठात्यांकडून पोलिसांत तक्रार देण्यासह पोलिसांसोबत समन्वय साधून सुरक्षा वाढवण्याची हमी दिल्यावर विद्यार्थिनी शांत झाल्या. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेची खरी माहिती पुढे येईल.

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. तातडीने येथे सुरक्षा वाढवली जाईल. मेडिकल परिसरात वावरणाऱ्या असामाजिक तत्वांवर नियंत्रणासाठी प्रशासन अजनी पोलिसांच्या मदतीने प्रयत्न करेल.

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर</strong>