उपराजधानीतील मेडिकल, मेयोत उपचार घेणाऱ्या क्षयरोगग्रस्त रुग्णांना अमेरिकेतील बिल क्लिंटन फाऊंडेशनने आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेडिकल व मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयात लवकरच ‘सीबी नेट’ उपकरणांवर क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या तपासणी सुरू होतील. मेयोत यंत्र पोहचले असून मेडिकलमध्येही लवकरच पोहचेल. या उपकरणावर दोन तासात क्षयरोगाचे अचूक निदान होते, हे विशेष.
क्षयाचे भय दूर करण्यासाठी सार्वजनिक विभागातर्फे युनिव्हर्सल एक्सेस टू टी.बी. केअर, ९९ डॉट्स प्रकल्प, सीबी नेट मशीन या तीन योजना प्रायोगिक तत्त्वावर नागपुरात सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे क्षयरुग्णांवर प्रभावी उपचार करण्यास मदत होईल. सुरुवातीला सूक्ष्मदर्शिका, एक्सरेच्या माध्यमातून क्षयरोगाचे निदान होत असे. शरीराच्या इतर भागात होणाऱ्या क्षयरोगाचे निदान न झाल्याने मृत्यूदर वाढला आहे, परंतु अलीकडे सीबी नेट उपकरणाच्या निदानातून क्षयाचे १०० टक्के निदान होणार आहे. क्षयरोगमुक्तीसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हा क्षयरोग केंद्रात सीबी-नेट यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय मेडिकल आणि मेयोत हे उपकरण देण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्यसेवेच्या क्षयरोग विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. क्षयरोगतज्ज्ञ डॉ. घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सीबी-नेटवर निदान करण्यात येईल. डॉ. नदीम खान यांनी हे उपकरण नागपूरच्या दोन्ही महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांना मिळावे म्हणून विशेष प्रयत्न केले, हे विशेष.

सव्वालाख क्षयरुग्ण
महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी नवीन १ लाख २० हजारांच्या जवळपास क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद होते, तर उपचारादरम्यान बरेच मृत्यू होतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ात सुमारे ७९ क्षयरोग निदान नोंदणी केंद्र अस्तित्वात आहेत. आढळणाऱ्या एकूण क्षयग्रस्तांपैकी सुमारे ५० टक्के रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार होतात.