कालमर्यादेत लक्ष्य गाठण्याचे नागपूर विभागासमोर आव्हान
‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’ या अभियानांतर्गत रेल्वेने रेल्वेस्थानक आणि प्रवासी डब्यांमध्ये स्वच्छता मोहीम उघडली आहे. तसेच रेल्वे डब्याच्या शौचालयातून रेल्वे रुळांवर पडणारे मलमूत्र आणि त्यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जैव शौचालयाच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात असले तरी या पर्यावरणस्नेही शौचालयाची सध्याची संख्या बघता आणि ते बसवण्याची गती बघता रेल्वे स्वत:च्या कालमर्यादेत लक्ष्य गाठण्याची शक्यता नाही.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात केवळ ३७ डब्यांमध्ये जैव शौचालय आहेत. या डब्यांपैकी काही डबे गोंदिया- बल्लारशहा, नागपूर- रामटेक आणि जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये वापरले जात आहेत, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांनी सांगितले. अशीच अवस्था मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची आहे. नागपूर विभागात ३४० रेल्वे डबे आहेत. त्यापैकी केवळ ८० डब्यात जैव शौचालय बसवण्यात आले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात १७००० बॉयो टॉयलेट रेल्वेडब्यात बसवण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेस्थानकावर अतिरिक्त ४७५ शौचालये उभारण्यात येणार आहेत. रेल्वेत सुमारे ५० हजार डबे आहेत. प्रत्येक डब्यामध्ये चार जैव शौचालये बसवावे लागतील. याचा अर्थ ४२५० डब्यांमध्ये येत्या वर्षभरात जैव शौचालय बसवण्यात येतील. त्यामुळे २०२१ पर्यंत संपूर्णत: जैव शौचालय असलेले डबे करण्याचे लक्ष्य गाठण्याचे मोठे आव्हान रेल्वेसमोर आहे.
रेल्वेने जैव शौचालयाच्या माध्यमातून मलमूत्राचे रूपांतर पाण्यात करणारी जंतू असलेली टाकी विकसित केली असून त्याचा शौचालयात वापर केला जातो. या जंतूमुळे मलमूत्राचे रूपांतर पाण्यासोबतच मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईडमध्ये केले जाते. यामुळे परांपरात शौचालयाप्रमाणे मलमूत्र रेल्वे रुळावर पडत नाहीत. तसेच रेल्वेच्या परिसरातील जलसाठे, नद्या, नाले प्रदूषित होत नाहीत.
या नवीन पद्धतीच्या शौचालयात डब्याच्याखाली असलेल्या टाकीत मलमूत्र पडत असते. त्या टाकीतील विशिष्ट प्रकारचे जंतू असतात. ते या मलमूत्राचे निरुपद्रवी पाणी आणि वायूत रूपांतर करते. हे जैव शौचालयात पर्यावरणस्नेही तर आहेच, पण त्यामुळे रेल्वे रुळांचे नुकसान टाळले जाते आणि रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडते. एरवी रेल्वेस्थानकावरील रुळावर गाडी गेल्यावर पाणी टाकण्यात येते तसेच ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. जैव शौचालयामुळे ते करावे लागणार नाही. गाडी यार्डात गेल्यावर जैव शौचालयाची टाकी रिकामी करावी लागते.

२६० डब्यांना जैव शौचालयाची प्रतीक्षा
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ३४० डबे आहेत. त्यापैकी ८० डब्यांमध्ये २६९ बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत. दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ११४ डबे आहेत. त्यापैकी ३७ डब्यांमध्ये १३० जैव शौचालयात बसवण्यात आले आहेत.

माटुंगा येथे व्यवस्था
प्रत्येक १८ महिन्यांनी डब्याची संपूर्ण देखभाल दुरुस्ती केली जाते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील डबे माटुंगा येथील कार्यशाळेत कालबद्ध देखभाल दुरुस्तीसाठी (पीओएच) जातात.

हरित लवादात याचिका

रेल्वे रुळावर शौच पडत असल्याबद्दल उत्तर दाखल करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने (पश्चिम क्षेत्र) रेल्वेच्या पर्यावरण संचालनालयाला दिले आहेत. रेल्वे डब्याच्या शौचालयाच्या माध्यातून दररोज सुमारे ४ हजार टन मानवी शौच रेल्वे रूळ आणि परिसरात उघडण्यावर टाकली जाते. ते पर्यावरणासाठी हानिकारक असल्याची पर्यावरण हित याचिका (ईआयएल) राष्ट्रीय हरित लवाद पुणे येथे दाखल करण्यात आली आहे. त्यावर रेल्वेने अद्याप उत्तर दाखल केले नाही.