उपक्रमात नागपूरच्या प्रकल्पाचे उल्लेखनीय योगदान

भारत सरकारने सर्व रेल्वेगाडय़ांमध्ये मार्च २०१९ पर्यंत जैव शौचालये बसवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उपक्रमात नागपुरातील जैव शौचालय निर्मिती केंद्राचा मोठ वाटा आहे.

गेल्या वर्षभरात येथे तीन हजार जैव शौचालये तयार करण्यात आली असून पुढील वर्षी तीन हजार सहाशे जैव शौचालये तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, असे जैव शौचालय निर्मिती प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक (कार्य) पी.एस. खैरकर यांनी सांगितले. खैरकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मोतीबाग कार्यशाळेत रेल्वेचा जैव शौचालय निर्मिती प्रकल्प आहे. भारतीय रेल्वे आणि संरक्षण संशोधन विकास संघटना (डीआरडीओ) यांचा हा देशातील एकमेव संयुक्त उपक्रम आहे. येथे ‘इनोकुलम’ या बॅक्टेरियाची निर्मिती केली जाते आणि त्याच्या माध्यातून जैव शौचालय तयार केले जातात.

डीआरडीओच्या ग्वाल्हेर येथील प्रयोगशाळेत ‘इनोकुलम’ची निर्मिती करण्यात आली. तेथे जैव शौचालयाचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर हे तंत्रज्ञान रेल्वेला देण्यात आले. येथील मोतीबाग कार्यशाळेच्या परिसरात ‘इनाक्युलम’ निर्मिती प्रकल्प तसेच जैव शौचालय निर्मिती केंद्र २३ जानेवारी २०१४ ला सुरू करण्यात आले. यात वर्षांला तीन हजार जैव शौचालये तयार केली जातात.

भारतीय रेल्वेची गरज वर्षांला ८० हजार शौचालयांची आहे. रेल्वेने मार्च २०१९ पर्यंत सर्वच गाडय़ांमधील डब्यांमध्ये जैव शौचालये बसवण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे रेल्वेची गरज भागवण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे, असे पी.एस. खैरकर यांनी सांगितले.

‘‘मोतीबाग येथील जैव शौचालय निर्मिती प्रकल्प हा रेल्वेचा देशातील एकमेव प्रकल्प आहे. वर्षांला तीन ते साडेतीन हजार शौचालये निर्मितीची या प्रकल्पाची क्षमता आहे. रेल्वेला दरवर्षी सुमारे ८० हजार शौचालयांची आवश्यकता आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून शौचालये तयार करवून घेतली जात आहेत. मार्च २०१९ पर्यंत रेल्वे गाडय़ांच्या सर्व डब्यांमध्ये जैव शौचालये लावण्यात येतील. ’’

 – पी.एस. खैरकर, मुख्य व्यवस्थापक (कार्य), जैव शौचालय निर्मिती प्रकल्प.