बीएनएचएसतर्फे जैवविविधता संवर्धन नेतृत्त्व अभ्यासक्रम

आजच्या वेगवान, तंत्रज्ञानावर आधारित व झपाटय़ाने शहरीकरण होत चाललेल्या जगात आपल्यापैकी अनेकजण निसर्गाकडे पाठ फिरवत आहेत. पण निसर्ग आपल्यापासून कधीच दूर जात नसतो. आसपासच्या परिसरात आढळणारा महाकाय पिंपळ वृक्ष किंवा चिवचिवणारी लहानशी चिमणी नेहमीच निसर्ग आपल्याबरोबर असल्याची झलक दाखवत असते. मानवी जीवन कितीही प्रगत किंवा अत्याधुनिक झाले तरी आणि निसर्गच आपल्या बहुतांशी गरजा पूर्ण करीत असल्याने निसर्गाच्या दैवी सौंदर्याशिवाय आपण अपूर्ण आहोत.

बीएनएचएस संवर्धन शिक्षण केंद्राच्यावतीने जैवविविधता संवर्धन नेतृत्त्व अभ्यासक्रमाचा वर्ग आता सुरू होत आहे. दैनंदिन जीवनाच्या धावपळीत अडकलेल्या सर्व निसर्गप्रेमींसाठी वृक्ष, पशू, पक्षी, फुलपाखरे व त्यांचे जग जाणून घेण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. मिश्र अशा अर्धवेळ प्रमाणपत्र अभ्यासक्रमात बीएनएचएसच्या तज्ज्ञांनी बनवलेले व वेळोवेळी सुधारीत रुपात आखलेले ऑनलाइन शैक्षणिक साहित्य व अभ्यासदौरे समाविष्ट आहेत. नवखे व हौशी निसर्गप्रेमी तसेच जैवविविधता व पर्यावरण क्षेत्रात काम करणारे अशा दोघांनाही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर बीएनएचएसतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल. भारताची जैवविविधता, नैसर्गिक अधिवास, संवर्धन समस्या व धरणाक्षम जीवनशैलीबाबत उपयुक्त माहिती दिली जाईल. बीएनएचएस तसेच इतर संस्थांमधील तज्ज्ञ व शास्त्रज्ञांना भेटण्याची व संवाद साधण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळेल. परिसरातील जैवविविधता व निसर्गाची शास्त्रीय पद्धतीने नोंद घेण्याची संधी प्राप्त होईल. याचा उपयोग लेख प्रकाशित करण्यासाठी व बीएनएचएस सीईसीमध्ये मार्गदर्शक म्हणून सहभागी होण्यासाठी होऊ शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात शाश्वत पद्धतींवर आधारित बदल घडवून निसर्ग संवर्धनाची संधी मिळेल. या अभ्यासक्रमात जैवविविधता, परिसंस्था, निसर्ग संवर्धन, सस्तन प्राणी, उभयचर/सरपटणारे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, सागरी जीव आणि धरणाक्षम विकास आदी विषयांवर धडे आणि गृहपाठ असेल. सोप्या इंग्रजीत लिहिलेल्या या धडय़ांमध्ये जागोजागी विषयानुरुप चित्र व आकृती दिल्या असतील.

जून २०१६ ते फेब्रुवारी २०१७ असा नऊ महिन्याचा अभ्यासक्रम असून ऑनलाईन धडे व गृहपाठ दर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सहभागी होणाऱ्यांना पाठवले जातील. संवाद साधण्यासाठी फेसबुक व गुगल टॉक यासारखी ऑनलाईन माध्यमे वापरली जातील. निसर्ग पदभ्रमण दौरे शक्यतोवर रविवारी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. तसेच निसर्ग शिबिरेसुद्धा सुट्टीच्या दिवसांना जोडून आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिल्या महिन्यात ओळख शिबीर तर शेवटच्या महिन्यात समारोप शिबीर मुंबई सीईसीमध्ये असेल. गृहपाठात धडे, निसर्ग शिबिरे व अभ्यास दौरे याव्यतिरिक्त ई-माहिती, ऑनलाईन संशोधन, निसर्गस्नेही दिन, शिबीर वृत्त, ऑनलाईन गप्पा व अभ्यास प्रकल्प याचा समावेश आहे.

भारताची जैवविविधता, निसर्ग व त्याच्या संवर्धनाची आवड असलेले सर्व जण या अभ्यासक्रमास पात्र आहेत. सहभागी होणाऱ्यांनी किमान दहावी उत्तीर्ण असावे, तसेच संगणक व इंटरनेटचा वापर करता यावा. आठवडय़ातील काही काळ अभ्यासक्रमासाठी देण्याची तयारी असावी. अभ्यासक्रमाचे शुल्क दहा हजार रुपये असून, त्यात बीएनएचएस तज्ज्ञांचे ऑनलाईन व अभ्यास शिबिरादरम्यान मार्गदर्शन, धडे, गृहपाठ, मूल्यांकन व सीईसीमधील शिबिरादरम्यानचे जेवण, नाश्ता समाविष्ट आहे. बीएनएचएसच्या सदस्यांना अभ्यासक्रमाच्या मुळ शुल्कावर दहा टक्के सवलत मिळणार आहे. नोंदणी अर्ज www.bnhs.org या संकेतस्थळावर मिळेल किंवा leadbiodiv100@gmail.com या ई-पत्त्यावरुन मागवता येईल. अधिक माहितीसाठी ०२२-२८४२९४७७ किंवा ९५९४९५३४२५ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन बीएनएचएसच्यावतीने करण्यात आले आहे.