वनखात्याचे संकेतस्थळ आता पूर्णपणे मराठीतून तयार झाले असताना जैवविविधता संकेस्थळाला मात्र अजूनही मराठीचे वावडे आहे. एवढेच नव्हे तर दोन वषार्ंपासून ते सदोष स्थितीतच आहे. लोकसत्ताने या संकेतस्थळातील त्रुटींच्या संदर्भात त्याचवेळी मंडळाच्या सदस्य सचिवांना विचारले असता त्रुटी असल्याचे त्यांनीही मान्य केले, पण दोन-तीन महिन्यांतच त्रुटी दूर करू, असे आश्वासनही दिले.
मात्र, दोन वर्षांनंतरही मंडळाच्या संकेतस्थळात फारशी सुधारणा झालेली नाही आणि सदोष संकेतस्थळ अद्यापही कायम आहे.
राज्यातील सर्व सरकारी खात्यांचा कारभार मराठीतून करावा, असे अधिकृत आदेश आहेत. त्यानुसार वनखात्याचे संकेतस्थळ अद्ययावत झाले असून पूर्णपणे मराठीतील हे संकेतस्थळ अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. असे असताना राज्याच्या जैवविविधता मंडळाचे संकेतस्थळ जणू जबरीने मराठी लादल्यासारखे सुरू आहे.
वास्तविक जैवविविधतेचा संबंध ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राशी आहे. अशास्थितीत त्यांना जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्याच भाषेतून संवाद साधणेही तेवढेच गरजेचे आहे.
दोन वषार्ंपूर्वी या संकेतस्थळाचे केवळ शीर्षकच मराठीतून होते. त्यानंतर मंडळाच्या संकेतस्थळाची गाडी फारशी पुढे गेलेली नाही. माहिती मराठीतून देताना ‘फॉन्ट’चा अडथळा येत असेल तर पीडीएफचा पर्याय उपलब्ध आहे.
या पर्यायाचा वापर संकेतस्थळावर केला गेला नाही. अनेक विभागात माहितीच उपलब्ध नाही. जैवविविधता या विभागात सागरी जैवविविधता या रकान्यात काहीच माहिती नाही. प्राणी जैवविविधता या रकान्यात इंग्रजीतून माहिती आहे.
बातम्यांच्या विभागातही केवळ इंग्रजीतील बातम्या आणि त्यासुद्धा दोन किंवा चार ओळींच्याच आहेत. उपक्रम विभागातही फारसे असे काहीच नाही आणि जे उपक्रम यात दर्शविण्यात आले आहेत ते सुद्धा इंग्रजीतून आहेत. २०१४ पर्यंतचीच माहिती यात उपलब्ध असून २०१५चा जैवविविधता दिवस साजरा केल्याची केवळ माहिती आहे.
मंडळाच्या केवळ अध्यक्षांचे नाव, जन्मतारीख, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल, शैक्षणिक पात्रता, संशोधन विषय एवढी माहिती दिलेली आहे. सदस्यांची केवळ छायाचित्रे आहेत, दूरध्वनी, ई-मेल वा इतर काहीही माहिती उपलब्ध नाही.
या सदोष संकेतस्थळातून गावखेडय़ातील ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील लोकांना खरंच फायदा होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वनखात्याचे संकेतस्थळ अवघ्या दोन महिन्यांत पूर्णपणे मराठीतून कार्यान्वित झाले असताना त्याच खात्याचा भाग असलेले जैवविविधता संकेतस्थळाला मात्र मराठीचे अजूनही वावडे आहे. मंडळाचे आधीचे अध्यक्ष इरिक भरुचा पुण्याचे होते आणि पुण्यातूनच ते कार्यभार चालवत होते. मंडळाचे कार्यालय नागपुरात आले आणि मंडळाची धुरा डॉ. विलास बर्डेकर यांच्या हातात आल्यानंतर त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, त्यांनीही पुण्यात बसूनच कार्यभार चालवणे पसंत केले आहे.