कामचुकारांचा पराक्रम बघून आयुक्तही चक्रावले; अचानक दिलेल्या भेटीत अनेकांचे पितळ उघड

महापालिकेच्या विविध कार्यालयातील ‘सरकारी प्रवृत्ती’मुळे नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागतो. कधी कर्मचारी जागेवर सापडत नाही तर कधी अधिकारी दौऱ्यावर असतात. एकाच टेबलवर आठ आठ दिवस फाईल पडून असते. सतत पाटय़ा टाकणाऱ्या या कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे महापालिकेची बदनामी ही नित्याचीच बाब झाली आहे, परंतु आता त्याही पुढे जात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक  मशीनमध्येच फेरफार केली असून त्यात आपल्या सोयीनुसार वेळ सेट केली आहे. महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी महापालिकेच्या विविध कार्यालयात अचानक भेट दिली असता हा ‘वेळेचा खेळ’ उघड झाला. कर्मचाऱ्यांचा हा भीमपराक्रम बघून आयुक्तही चक्रावून गेले.

महापालिकेच्या आयुक्तपदी वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी विविध विभागात भेटी देऊन पाहणी केली आणि शिस्तीच्या आणि कामाच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या. मात्र, दिलेल्या सूचनाचे विभाग प्रमुखांसह  कर्मचाऱ्यांकडून कुठलेही पालन होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता विविध विभागांना भेटी देणे सुरू केले. यावेळी कार्यालयीन वेळ होऊन गेली तरी अनेक विभागात बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित नव्हते.

आयुक्त विभागात भेटी देत असल्याचे कळताच बाहेर आणि कार्यालय परिसरात फिरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी धावपळ करीत कार्यालय गाठले, परंतु तोपर्यंत अनेकांचे पितळ उघडे पडले होते. जे कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय सुटीवर होते अशा कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.

वेतन कापण्याचे निर्देश

आयुक्तांनी विविध विभागांना भेट दिली असता त्यांना विद्युत विभागात १०, शिक्षण विभागात १६, पशुवैद्यक विभागात ९, उद्यान विभागात २४, सामान्य प्रशासन विभाग २४, आरोग्य विभाग ४०, सॅनिटेशन ३९, हॉट मिक्स प्लान्ट ५, एलबीटी विभाग ३३, बाजार विभाग १४,  बांधकाम विभाग १७, कर विभाग ३४, नगररचना विभाग १४, वॉटर वर्क्‍स २१ इतके कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असल्याचे दिसले. सर्व विभागाच्या बायोमेट्रिक मशीन अपडेट करण्याच्या सूचना देत जर सतत तीन दिवस कर्मचारी उशिरा आला असेल  तर त्यांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

टपरीवरचा टाईमपास महाग पडेल

अधिकारी, कर्मचाऱ्याला जर  बाहेर जायचे असेल त्याने कुठे जातो, किती वाजता जातो आणि परत किती वाजता आला, याची नोंद करायला हवी. ते रजिस्टर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे राहील. याशिवाय कार्यालयीन वेळेत विनाकारण चहाच्या टपरीवर किंवा कॅन्टीनमध्ये वेळकाढू धोरण राबवले जात असेल तर अशांवर कारवाई केली जाणार आहे.