डॉ. सलीम अली यांना आदरांजलीसाठी उपक्रम
पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या डॉ. सलीम अली यांना पक्षीनिरीक्षण आणि पक्षीगणना करून पक्षीनिरीक्षकांच्यावतीने एक आगळीवेगळी भेट जन्मदिनानिमित्त देण्यात येत आहे. १२ नोव्हेंबरला त्यांची जयंती असली तरीही यावर्षी मात्र १५ नोव्हेंबरला त्यांना संपूर्ण भारतात या उपक्रमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांमध्ये पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश त्यामागे आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. भारताचा पक्षीमाणूस, अशी डॉ. सलीम अली यांची ओळख आहे. यावर्षी त्यांचा जन्मदिन पक्षीनिरीक्षण व पक्षीगणनेतून साजरा केला जात आहे. यावर्षी १५ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यापुढे मात्र १२ नोव्हेंबरला साजरा करण्यात येईल. याकरिता संपूर्ण भारतातून पक्षीप्रेमी व पक्षीनिरीक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, कुणीही यात सहभागी होऊ शकतील आणि त्यांच्या कुटुंब किंवा मित्रमंडळींनासुद्धा यात सहभागी होता येईल. या उपक्रमामुळे त्यांना भारतातील पक्षीवैभव जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या पक्षीप्रेमींना कमीतकमी १५ मिनिटांपासून, तर एक तासापर्यंत पक्षीनिरीक्षण करायचे आहे. त्यासाठी त्यांना ठिकाणाचे बंधन नाही. ते पक्ष्यांच्या विविध अधिवासांना भेट देऊ शकतात. मात्र, त्याचवेळी या वेगवेगळ्या अधिवासक्षेत्रात आढळलेल्या पक्षीप्रजातीची वेगवेगळी यादी त्यांनी संकेतस्थळावर टाकणे अपेक्षित आहे.
या उपक्रमामुळे महत्त्वाच्या पक्षी अधिवासाला भेट देण्याची संधी पक्षीनिरीक्षकांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी http://www.ebird.org/india या संकेतस्थळावर भेट किंवा बीएनएचएसच्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन बीएनएचएसच्यावतीने करण्यात आले आहे.

संकेतस्थळावर यादी अपेक्षित
प्रत्येक वर्षी एकाच अधिवास क्षेत्राला पक्षीप्रेमी व पक्षीनिरीक्षक भेट देत असतील, तर त्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्ष्यांची स्थिती आणि त्यांच्या अधिवास क्षेत्रांची स्थिती याची एकूण माहिती जमा होणार आहे. पक्षीनिरीक्षणादरम्यान आढळलेल्या सर्व पक्षी प्रजातींची यादी त्यांना http://www.ebird.org/india या संकेतस्थळावर टाकायची आहे. या यादीतून बीएनएचएसच्यावतीने पक्ष्यांची प्रजाती, अधिवास आदीची वर्गवारी करण्यात येईल. यानंतर बीएनएचएसद्वारे पक्षीनिरीक्षण आणि गणनेचा संपूर्ण अहवाल जाहीर करण्यात येईल.