भारतातून अनेक पक्षी नामशेष होत असताना त्यांच्यावरील अभ्यासासाठी त्यांना ‘रिंगिंग’केले जाते. यामध्ये असणाऱ्या ‘चीप’च्या माध्यमातून संशोधकांना त्या पक्ष्याची माहिती मिळते. या माहितीच्या आधारावर त्याच्या संवर्धनासाठी पावले उचलली जातात. नामशेषाच्या यादीतील पक्ष्यांवर होणारा हा प्रयोग आता उपचार केंद्रातील पक्ष्यांबाबतदेखील केला जाणार असून उपराजधानीतील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राने या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

माळढोक, गिधाड यांसारख्या अनेक पक्षी प्रजाती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामागील कारणे शोधण्यासाठी त्यांच्या पायाला ‘रिंग’ लावली जाते. त्यात असलेल्या ‘चीप’च्या माध्यमातून त्या पक्ष्याच्या भ्रमंतीदरम्यानची सर्व माहिती संशोधकांना मिळते. स्थलांतरित पक्ष्यांवर संशोधन करतानाही हीच पद्धत वापरली जाते. आता पहिल्यांदाच पक्षी अभ्यासात एक नवे पाऊल उचलले जात आहे. नागपुरातील सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या आणि उपचारानंतर बऱ्या झालेल्या पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी ‘रिंग’ लावली जाणार आहे. यात दुर्मीळ पक्षी, स्थलांतरित पक्षी आणि संकटग्रस्त पक्ष्यांना प्राधान्याने ही ‘रिंग’ लावली जाणार आहे. उपचारानंतर बरे झालेले हे पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पूर्णपणे स्थिरावतात का, ते पूर्वीसारखेच आयुष्य जगतात का, याचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात येत आहे. या केंद्राने शेकडो पक्ष्यांना जीवदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. स्थानिक, स्थलांतरित, दुर्मीळ पक्षी या केंद्रात ठिकठिकाणाहून उपचारासाठी येत असतात. मात्र, उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात गेलेल्या या पक्ष्यांचे काय होते याविषयी माहिती नसते. हा प्रयोग पक्षी अभ्यासकांसाठी देखील महत्त्वाचा ठरणार आहे. पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात येत असताना त्याच्या संवर्धनासाठी या प्रयोगामुळे मदत होणार आहे.