राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुवारी झालेल्या बौध्दिकाला दांडी मारणाऱ्या २२ आमदारांना भाजपने स्पष्टीकरण विचारले असून सभागृहात परवानगीखेरीज गैरहजर राहणाऱ्या १२ आमदारांनाही ताकीद देण्यात आली आहे. मात्र मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीमुळे कामकाज तहकूब होण्याची वेळ आठवडय़ात काही वेळा आली असताना आमदारांनाच शिस्तीचा बडगा कशासाठी, असा सवाल पक्षात विचारला जात आहे.
हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांना संघाच्या मुख्यालयात एक दिवस मार्गदर्शन केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ मंत्री या बैठकीस उपस्थित होते.
सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी सर्वाना मार्गदर्शन केले. पक्षाला न कळविता दांडी मारणाऱ्या आमदारांना विचारणा करणारे पत्र भाजपने पाठविले आहे. त्याचबरोबर सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहण्याचीही सक्ती असून वैयक्तिक कारणांसाठी गैरहजर रहायचे असेल, तर पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
पक्षाचे प्रतोद राज पुरोहित हे काटेकोरपणे आमदारांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे काही आमदार नाराज आहेत.

ट्रॅकसूटमुळे अडचण?
ट्रॅकसूट परिधान करून आलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रथम स्मृति मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले. काही वेळ ते थांबले आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांचे बौद्धिक होण्यापूर्वीच निघून गेले. एरवी भाजपचे मंत्री आणि आमदार यांना सरकार्यवाहांच्या बौद्धिकाची नेहमी उत्सुकता असते. तथापि महाजन मात्र बौद्धिकापूर्वीच स्मृती मंदिर परिसरातून निघून केले. ट्रॅकसूट परिधान केल्याने महाजन यांना तिथून जावे लागल्याची चर्चा होती.