News Flash

भाजपचे वीज दरवाढीविरुद्धचे आंदोलन फसवे -नितीन राऊत

फडणवीसांच्या काळातच ५१ हजार कोटींची थकबाकी!

(संग्रहित छायाचित्र)

सत्ता हातातून गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला आहे. वीज देयकाच्या वसुलीविरुद्ध त्यांनी आज केलेले आंदोलन फसवे असून त्याला जनसमर्थन नाही, अशी टीका ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. जनतेचा भाजपवरील विश्वास उडाल्याने हा पक्ष स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन करून केविलवाणी धडपड करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

टाळेबंदीच्या काळात राज्यात वीजपुरवठा सुरळीत होता. मात्र वीज देयक वसूल करण्यात आले नव्हते. त्यामुळे महावितरण संकटात सापडले. महावितरणकडे ७१ हजार कोटींची थकबाकी असून त्यापैकी ५१ हजार कोटी रुपये हे फडणवीस सरकारच्या काळातील आहेत, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

राज्यात वाढीव वीज देयकाविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. त्यावर बोलताना डॉ. राऊत म्हणाले, विधान परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पानिपत होण्याची भीती त्यांना आतापासूनच त्रस्त करीत आहे. वीज हा सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून आंदोलनाचा खटाटोप आहे. भाजपकडे सध्या कुठलेच ठोस मुद्दे नाहीत. शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर तर केंद्र शासन व भाजप पूर्णपणे तोंडघशी पडले आहे. केंद्र सरकारचे सर्वच आघाडीवरील अपयश, चीनसमोर पत्करलेली शरणागती, देशाच्या आर्थिक स्थितीमुळे जनतेत असलेला रोष यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते वेळोवेळी आंदोलने करण्याचा खटाटोप करीत आहेत. करोनाकाळात राज्यातील वीजग्राहकांचे कोटय़वधी रुपये थकले असतानाही वीजपुरवठा खंडित केला नाही, परंतु कोळसा आणि तेल यासाठी अग्रिम रक्कम द्यावी लागते. लोकांनी देयक भरलेच नाही तर वीजनिर्मिती, वीज खरेदी, पारेषण आणि वितरण यावरील खर्च कुठून करणार,  महावितरणचे खासगीकरण करून काही मूठभर भांडवलदारांना महावितरण सोपविण्याचा भाजपचा प्रयत्न होता. आजचे आंदोलन म्हणजे या पापावर पांघरूण घालण्याचा प्रकार असल्याचे राऊत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 12:16 am

Web Title: bjp agitation against power tariff fraud nitin raut abn 97
Next Stories
1 संघर्षमय प्रवास..
2 पर्यावरण मंजुरीसाठी अटींचे पालन करणारी देखरेख यंत्रणा सुधारा
3 ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ७० हजार कोंबडय़ा नष्ट
Just Now!
X