महापालिका सभेत गुडधे यांची टीका; दयाशंकर तिवारींकडून मुंढेंवर आरोप

नागपूर : मागील तेरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला शहरात कोणताही विकोस करता आला नाही. आर्थिक नियोजन नसल्याने करोनासारख्या महामारीला तोंड देताना लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे  आपले अपयश झाकण्यासाठी भाजप आता आयुक्त तुकाराम मुंढे यांना नामोहरम करीत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी सर्वसाधारण सभेत केला.

आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसने आयुक्तांऐवजी भाजपला लक्ष्य केले. गुडधे यांनी आयुक्तांना विरोध करण्याच्या विषयावरून भाजपने केलेल्या स्थगन प्रस्तावाच्या राजकारणावरही टीका केली. महापालिकेत अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने शहराचे वाटोळे केले. पावसाळा आला तरी अद्याप मेनहोल्सवर झाकणे लावता आली नाही. चेंबर दुरुस्त झाले नाही, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. ते झाकण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेच्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून भाजप आयुक्त मुंढे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत  आहेत. अधिकाऱ्यांवर वैयक्तिक टीका करताना आपण कुठे चुकलो, याचाही सत्ताधारी आणि विरोधकांनी विचार करावा. महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्वीसारखीच आहे. उत्पन्न वाढवताना  खर्चावरही मर्यादा आणणे आवश्यक होते. मात्र ते आजपर्यंत झाले नाही. करोनाच्या काळात कुणाला काम करण्यास रोखण्यात आले नव्हते असे सांगत गुडधे यांनी भाजपवर टीका केली. महापालिकेकडे कुठलेही आर्थिक नियोजन नाही. त्याचा फटका  करोना महामारीच्या काळात  नागरिकांना बसत आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपचे ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या प्रदीर्घ भाषणात आयुक्तांना धारेवर धरले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गंटावार यांच्या पत्नीच्या नियुक्तीवरून प्रश्न उपस्थित केले. याशिवाय विलगीकरण केंद्र, रुग्णालयाची निर्मिती, निवारा केंद्र, करोनाबाधित रुग्णांचे तपासणी अहवाल, वेगवेगळ्या भागात करण्यात आलेले सर्वेक्षण आणि आयुक्तांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून केलेली प्रसिद्धी याबाबत तिवारी यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्तांनी विलगीकरणाचे चुकीच्या पद्धतीने केलेले नियोजन आणि एकतर्फी घेतलेल्या निर्णयावर  टीका करत त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, पिंटू झलके, वैशाली नारनवरे यांनीही प्रशासनाच्या कार्यशैलीवर टीका केली.

सभेच्या नावावर पैसा, वेळेचा अपव्यय

महापालिका सभेत तीन दिवसांपासून केवळ मुंढे यांना लक्ष्य केले जात आहे. शहरात महामारीची साथ असताना व यंत्रणा कामात व्यस्त असण्याची गरज असताना सभेच्या निमित्ताने सर्वाना सभास्थळी बोलावले जात आहे. यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे. इतर महापालिका सभा एक दिवसात आटोपल्या. त्यात  केवळ ५० टक्के उपस्थिती होती. मात्र नागपूर महापालिकेच्या सभेत सामाजिक अंतर ठेवून व्यवस्था केली असली तरी सदस्यांशिवाय अधिकारी व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असे २०० पेक्षा अधिक लोक सभेला उपस्थित राहत आहेत.

‘आप’ची महापौरांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

टाळेबंदीच्या काळात महापालिकेची सभा बोलावून नियमभंग केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीने महापौर संदीप जोशी यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.