‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न अपयशी

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्याचा भाजपचा निर्णय पक्षाच्या पूर्व विदर्भातील कामगिरीवर प्रतिकूल परिणाम करणारा ठरला. मतदानापूर्वी पक्षाने केलेले ‘डॅमेज कंट्रोल’ फारसे उपयोगी पडले नाही, असे चित्र निकालातून दिसून येत आहे तसेच पक्षाच्या पातळीवरही दबक्या आवाजात याची चर्चा आता सुरू झाली आहे.

बावनकुळे यांची ओळख विदर्भातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अशी आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द कामठी विधानसभा मतदारसंघातून सुरू झाली व त्यानंतर सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पक्षाची सत्ता आल्यावर त्यांना ऊर्जा हे महत्त्वाचे खाते मिळाले. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा जाहीरपणे केले. ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवण्याची किमया केवळ बावनकुळेच करू शकतात असे गडकरी सांगत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्य़ात व शहरात केलेल्या कामांची दखल विरोधकही घेतात. विविध विभागांना निधी देण्याचा मुद्दा असो किंवा जिल्हा विकास योजनेचा आराखडा दीडशे कोटींहून आठशे कोटींपर्यंत नेण्याची किमया असो यातून बावनकुळेंच्या कामांची कामाची तडफ दिसून आली. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात पक्षबांधणीकडेही लक्ष दिले होते. त्यांचा कामठी मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. असे असताना त्यांना पक्षाने अचानक कामठीतून उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले होते. ते प्रतिनिधित्व करीत असलेला तेली समाज भाजपचा मतदार होता. त्यांनाही बावनकुळेंबाबत भाजपने घेतलेला निर्णय आवडला नसल्याचे संदेश समाज माध्यमातून फिरत होते. याचा फटका पक्षाला निवडणुकीत बसणार, असे वाटू लागल्याने भाजपने ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले. बावनकुळेंवर पूर्व विदर्भातील ३२ जागांची जबाबदारी सोपवण्यात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना मंत्रिपदापेक्षा मोठे पद देऊ, अशी घोषणा प्रचार सभेत केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यांना सोबत घेऊन प्रचारसभेत फिरले. खुद्द बावनकुळे यांनी विविध ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. मात्र बावनकुळे यांना उमेदवारी का नाकारली याचे कारण अद्यापही पक्षाने दिले नाही. त्यामुळे डॅमेज कंट्रोलचा विशेष उपयोग झाला नसल्याचे गुरुवारी जाहीर झालेल्या विधानसभेच्या निकालातून दिसून आले.

जिल्ह्य़ात भाजपने तीन जागा गमावल्या. खुद्द कामठी मतदारसंघात भाजपचे मताधिक्य कमी झाले. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्य़ात पक्षाच्या उमेदवाराला फटका बसला. नागपूर शहरात पूर्व नागपूरमध्ये पक्षाचे उमेदवार कृष्णा खोपडे  यांच्या मताधिक्यात घट होण्यामागे तेली समाजाची नाराजी हे एक कारण सांगितले जाते.