केवळ १२ दिवस मिळणार असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात

नागपूर : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अत्यल्प कालावधी मिळणार असला तरी नागपुरात भाजप वगळता इतर सर्व पक्षात उमेदवार ठरवण्यावरून अद्यापही घोळ सुरू आहे. उमेदवार निश्चित असल्याने भाजपने  मंगळवारी बैठक प्रचार नियोजनावर चर्चा केली. दुसरीकडे  प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे डोळे पक्षाचा उमेदवार कोण याकडे लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिलला नागपुरात मतदान होणार आहे. आजपासून प्रचार केलातरी एक महिना देखील उमेदवाराला मिळणार नाही. उमेदवारी अर्ज घेण्याच्या तारखेपासून केवळ १२ दिवसांचा वेळ प्रचारारासाठी उरतो. ही बाब लक्षात घेऊन भाजपने मंगळवारी तातडीने बैठक बोलावून प्रचार नियोजन सुरू केले. काँग्रेसच्या पातळीवर सध्या उमेदवार निश्चितीचा घोळ आहे. दिल्लीत १४ आणि १५ मार्चला होणाऱ्या निवडणूक समितीच्या बैठकीकडे स्थानिक कार्यकर्ते नजरा लावून बसले आहेत.  माजी खासदार नाना पटोले यांच्या नावाची चर्चा होताच पक्षांर्तगत विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल, याच चर्चेत कार्यकर्ते सध्या व्यस्त आहेत.

इतर विरोधी पक्षांची स्थिती वेगळी नाही. विदर्भ राज्य महाआघाडीने नागपुरातून उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी उमेदवार कोण हे अद्याप जाहीर केले नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ठरला नाही. बहुजन समाज पक्षाचे रविवारी  संमेलन झाले. परंतु उमेदवार  निश्चित झालेला नाही. बसपने प्रत्येक निवडणुकीत ९० हजार ते दीड सव्वा लाख मते घेतली आहेत हे येथे उल्लेखनीय.

‘‘गेल्या पाच वर्षांपासून पक्षबांधणी सुरू आहे.  सहाही मतदारसंघात संघटना  बुथ प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवार घोषित होताच प्रचाराला प्रारंभ केला जाईल.’’

– विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस.