नागपूर : भाजपने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या ओबीसी नेत्यांनी सत्ता जाताच नाराजीचा सूर आळवला असून पक्षात नाराजांची संख्या वाढत आहे. या क्रमात नागपूर जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही आहेत का, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. ही शंका स्वत: बावनकुळे यांनी दूर केली असून उमेदवारी नाकारल्याचे कुठलेही शल्य मला नाही आणि पक्षातील नाराजांपासून मी लांब आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते माजी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांना उमेदवारी दिली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल एका खासगी वाहिनीशी बोलताना बावनकुळे म्हणाले, खडसे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल बोलणार नाही. पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली नाही, याचे कोणतेही शल्य माझ्या मनात नाही. मला जी जबाबदारी दिली होती, ती योग्यरीत्या पार पाडली. राज्यातील ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचे भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. त्यावर बावनकुळे म्हणाले, भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना संधी दिली. मी पक्षामुळे मंत्री होऊ शकलो. तिकीट कापल्यामुळे मी पक्षावर नाराज नाही.