एकूण ५५ अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी आज गुरुवारी जिल्ह्य़ातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघात  उमेदवारांचे ४७ अर्ज दाखल झाले. त्यामुळे अर्जाची एकूण संख्या ५५वर गेली आहे. विशेष म्हणजे,  भाजप व काँग्रेसच्या इच्छुकांनी  पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्धच अर्ज दाखल करून बंडाचे संकेत दिले आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक सतीश होले (दक्षिण), भाजपचे सोनबा मुसळे (सावनेर) यांचा समावेश आहे. रामटेकमधून काँग्रेसने अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी चंद्रपाल चौकसे यांनी येथून आज अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे.

भाजप व काँग्रेसने शहरातील सर्व सहा मतदारसंघात त्यांच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली. दक्षिणमधून भाजपने मोहन मते यांना उमेदवारी दिली आहे. तरीही गुरुवारी या मतदारसंघातून पक्षाचे नगरसेवक सतीश होले यांनी अर्ज भरला. होले काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. पक्षाने माझा विचार केला नसल्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. दबाव आला तरी अर्ज मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने मध्यमधून बंटी शेळके यांना उमेदारी जाहीर केली आहे. ते उद्या अर्ज भरणार असले तरी तेथून याच  पक्षाचे नगरसेवक रमेश पुणेकरही  उद्या अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सावनेरमधून भाजपने राजू पोद्दार यांना उमेदवारी दिली आहे. तेथून पक्षाचे नेते सोनबा मुसळे यांनी अर्ज दाखल केला. ते २०१४ च्या निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. मात्र त्यांचा अर्ज छाननीत रद्द झाला होता. रामटेकमधील उमेदार काँग्रेसने गुरुवारी सायंकाळपर्यंत जाहीर केला नव्हता. मात्र त्यापूर्वीच येथून पक्षाचे चंद्रपाल चौकसे यांनी अर्ज दाखल केला आहे. आज एकूण १२ मतदारसंघातून ४७ अर्ज दाखल झाले. त्यात पश्चिमधून काँग्रेसचे विकास ठाकरे, दक्षिणमधून काँग्रेसचे गिरीश पांडव, हिंगण्यातून भाजपचे विद्यमान आमदार समीर मेघे व उमरेडमधून भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे यांचा समावेश आहे.