काँग्रेस- ८३,  भाजप- ७३; सदस्यांची पळवापळवी, मनसेलाही यश

नागपूर : ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीप्रमाणेच सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीतही भाजप व काँग्रेसने  सर्वाधिक जागा जिंकण्याचे दावे, प्रतिदावे केले आहेत.  काँग्रेसने १२९ पैकी ८३ ठिकाणी तर भाजपने ७३ ठिकाणी सरपंचपद पटकावल्याचा दावा केला आहे.

१५ जानेवारीला जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. तेथे गुरुवारी सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. सावनेर विधानसभा मतदारसंघात निर्वाचित सदस्यांची पळवापळवी तसेच सदस्य फोडण्याचे प्रकार झाल्याने ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली.

ग्रा.पं. निवडणूक निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा केला होता. सरपंचपदाच्या निवडणुकीतही दावे-प्रतिदाव्यांचे चित्र कायम आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने त्यांच्या प्रभावक्षेत्रात तुल्यबळ कामगिरी केल्याचे दिसून येते. सावनेर, उमरेडमध्ये काँग्रेसला, हिंगणा, कामठीत भाजपला आणि रामटेक व काटोलमध्ये अनुक्रमे सेना व राष्ट्रवादी समर्थित गटाला चांगले यश मिळाले. काही ठिकाणी आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने तेथील पद रिक्त ठेवण्यात आले. तेथे फक्त उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. पथराई (रामटेक तालुका) येथे मनसे समर्थित गटाचे संदीप वासनिक यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

७३ ठिकाणी भाजपचे सरपंच – गजभिये

जिल्ह्यात भाजप समर्थित गटाचे १२९ पैकी ७३ गावात सरंपच व ७० गावात उपरसंपच विजयी झाले, असा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केला. यात काटोल विधानसभा मतदारसंघात २२ पैकी ९, कामठी मतदारसंघात १९ पैकी १३, रामटेक मतदारसंघात २० पैकी ९ , उमरेडमध्ये ४१ पैकी ३२, हिंगणामध्ये १० पैकी ६ गावात भाजपचे सरपंच निवडून आले, असा दावा  गजभिये यांनी  केला. महाविकास आघाडीने फोडाफोडीचे राजकारण के ले. मात्र तरीही आम्ही सर्वाधिक जागा जिकल्याचे ते म्हणाले.

कळमेश्वर, सावनेरमध्ये काँग्रेस समर्थित सरपंच

कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील १७ ही ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस नेते व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या गटाचे सरपंच झाले. कळमेश्वरमध्ये पाच पैकी तीन ग्रामपंचायतींवर महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. सोनेगावमध्ये रूपाली पुनवटकर (सरपंच), गायत्री अंबोले (उपसरपंच), सेलमध्ये कुंती आसोले (सरपंच), प्रदीप चणकापुरे (उपसरपंच), आदासा (सोनपूर) नीता सहारे (सरपंच), नीलेश कडू (उपसरपंच),  कोहळीमध्ये सुनील करडभाजने (सरपंच), देवकांत वानखेडे (उपसरपंच) व सावंगी (घोगली)मध्ये एस.टी.साठी सपरपंचपद राखीव होते. मात्र या प्रवर्गातील सदस्य नसल्याने जागा रिक्त ठेवण्यात आली. उपसरपंचपदी प्रज्ज्वल तागडे यांची निवड झाली. या पाचही ठिकाणी काँग्रेस समर्थित गट सत्तेत आले. सावनेर तालुक्यातील जटामखोरा- सोनू रावसाहेब (सरपंच), मंगला उईके (उपसरपंच), टेंभूरडोह- दीपक सहारे (सरपंच), मोरेश्वर चौणारे (उपसरपंच), खुबाळा- अश्विनी ठाकरे (सरपंच), विजय कोडके (उपसरपंच), नादुंरा-सरपंचपद रिक्त, दीपक शिंगे (उपसरपंच), सोनपूर- सरपंचपद रिक्त- रामकृष्ण मरस्कोल्हे (उपसरपंच),  पाटणसावंगी-रोशनी ठाकरे (सरपंच), दीपक दलाल (उपसरपंच), जैतपूर-सरपंचपद रिक्त, स्नेहल नाईक (उपसरपंच), सावंगी हेटे- अशोक डोळे (सरपंच), शारदा माझी (उपसरपंच), खुर्सापार- वंदना गोलाईत (सरपंच), मंगेश जोगी (उपसरपंच), नरसाळा- ज्योती खोडे (सरपंच), प्रमोद घोडमारे (उपसरपंच), गडमी – लोकेश डोहाळे (सरपंच), रत्नमाला कातडे (उपसरपंच).

काटोल तालुक्यात राष्ट्रवादी

सरपंचपदाच्या निवडणुकीत काटोल तालुक्यात राष्ट्रवादी समर्थित सरपंच अधिक निवडून आले. माळेगाव- जया भूषण वानखेडे (सरपंच), दिगंबर विश्वनाथ लोखंडे (उपसरपंच), खंडाळा(खुर्द)- रेखा किशोर सयाम (सरपंच), हेमेंद्र चरडे  (उपसरपंच), भोरगढ- उमराव उईके (सरपंच), रोशन खरपुरिया (उपसरपंच)  यांची निवड करण्यात आल्याचे काटोलचे तहसीलदार अजय चरडे , नायब तहसीलदार  (निवडणूक  विभाग) एस.एम. टिपरे  यांनी सांगितले. हे सर्व राष्ट्रवादी समर्थित असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य चंद्रशेखर कोल्हे यांनी केला. भाजपचे संदीप सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

८३ गावात काँग्रेसचे सरपंच – मुळक

नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत  भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सरपंच व उपसरपंच निवडणुकीत १२९ पैकी ८३ गावात काँग्रेस समर्थित गटाचे सदस्य निवडून आल्याचा दावा, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केला आहे. जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद के ले आहे.