सलग तीन वा त्यापेक्षा अधिक टर्म महापालिकेवर निवडून आलेल्या सदस्यांच्या अनुभवाचा वापर येत्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर करून घेण्याचा विचार सध्या भारतीय जनता पक्षात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यास पक्षाच्या जुन्या व ज्येष्ठ नगरसेवकांसाठी महापालिकेची द्वारे बंद होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असला तरी विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०१२ च्या निवडणुकीत भाजपने काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली होती. काही पराभूत झाले होते. ते सर्व पुन्हा आपापल्या प्रभागात सक्रिय झाले आहेत. आता नाही तर कधीच नाही, अशी मानसिकता ठेवून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय वजन बघता पालिकेची निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची असल्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला देऊ नये हे दोन्ही नेते ठरवणार असले तरी पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणात समोर येत आहे. ज्या नगरसेवकांनी तीन वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे, अशा नगरसेवकांना आता पुन्हा उमेदवारी न देता त्या भागातील नव्या पदाधिकाऱ्याला वा ज्याचे जनमत आहे, अशांना उमेदवारी द्यावी, यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये खल सुरू आहे. प्राथमिक पातळीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. पक्षाने ही बाब ठरवली तर अनेक ज्येष्ठ सदस्य महापालिकेच्या राजकारणातून बाद ठरू शकतात. कार्यकर्ते आणि त्या त्या भागातील नागरिकांमध्ये कोणाची उमेदवारी कापली जाणार या चर्चेला सुरुवातही झाली आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील भाजपचा गड समजण्यात येणाऱ्या प्रभागातून पक्षाने स्थानिक उमेदवारांनाच संधी द्यावी, उमेदवार लादू नये, अशी मागणी तेथील कार्यकर्त्यांनी लावून धरल्याने बालेकि ल्ल्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. गेली निवडणूक लढणाऱ्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात पश्चिम, पूर्व, मध्य आणि दक्षिण पश्चिम नागपुरात काही प्रभाग हे भाजपचे बालेकिल्ले मानले जातात. त्यात महाल, किल्ला, पाचपावली, शिवाजीनगर, लक्ष्मीनगर या प्रभागांचा प्रामुख्याने समावेश होतो. या प्रभागात भाजपचा विजय हमखास मानला जातो. त्यामुळे अनेक बाहेरच्या नेत्यांचे लक्ष या प्रभागातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न असते. उमेदवारांची निवड ही वाडा आणि बंगल्यातून होणार असली तरी काही इच्छुकांची नावेही बाहेर येत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला स्थानिक उमेदवारच हवा’ असा आग्रह धरला जात आहे.