‘स्मार्ट सिटी’बाबत पंतप्रधानांचे भाषण
‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या वर्षपूर्ती निमित्ताने महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले असताना नागपूर विकास आघाडीतील भाजपसह अपक्ष उमेदवारांनी पाठ फिरवली. अनुपस्थित राहिलेल्या भाजप नगरसेवकांवर याबाबत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापालिकेतील सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने २१ जूनला महापालिकेला पत्र पाठविले होते. प्रत्येक महापालिकेच्या लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तसे आदेश काढले होते. शनिवारी मात्र महापालिकेच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी सत्तापक्षाचे नगरसेवकांसह केवळ १३ नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे केवळ ७ नगरसेवक होते. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना आणि केंद्राची स्मार्ट सिटी योजनेमध्ये येणाऱ्या दिवसात नागपूरचा क्रमांक लागण्याची शक्यता बघता कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक होते, मात्र प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नगरसेवकांनी पाठ फिरवली. आज सुटी असल्यामुळे कारवाई करण्यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नाही उद्या, सोमवारी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमाला नगरसेवकांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, मात्र पक्षाने असा कुठलाच आदेश काढला नव्हता किंवा त्यांना पत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे कारवाई करणे शक्य नाही, मात्र ज्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली त्यांना यापुढे स्मार्ट सिटी संदर्भातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिले पाहिजे अशी ताकीद दिली जाणार आहे.
दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेता, महापालिका