भाजपचे एकनाथ खडसे यांचा सवाल; पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवण्याची तयारी

सातत्याने पाठपुरावा करूनही मतदारसंघातील कामे होत नाहीत, अगदी मुख्यमंत्र्यांना भेटून आणि त्यांनी आदेश देऊनही पाणीपुरवठा यासारख्या जिव्हाळ्याची आणि लोकांच्या हिताच्या योजना मार्गी लागत नाहीत. सभागृहात विषय आल्यावर लगेच कार्यवाहीचे आश्वासन दिले जाते. हेच तुमचे राज्य आहे, अशा स्पष्ट शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज आपल्याच सरकारचे वाभाडे काढले.

एवढेच नव्हे तर शालेय पोषण आहार योजनेचे कंत्राट देण्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून मंत्र्यांनी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) याची चौकशी केल्यास तो सिद्धही करून दाखवण्याची आपली तयारी असल्याचे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. आधीच गुजरात निकालाने आत्मविश्वास वाढलेल्या विरोधकांनीही मग खडसे यांनी पुरविलेल्या या दारूगोळ्याचा पुरेपूर उपयोग करत मंत्र्यांवर हल्लाबोल केला.

विधानसभेत आज खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षाची भूमिका निभावल्याचे दिसून आले. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना अडचणीत आणत खडसे यांनी विरोधकांना चांगलाच मालमसाला पुरवला. शालेय पोषण आहार योजनेची निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला असून बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक दराने शालेय पोषण आहारचे कंत्राट देण्यात आले आहेत. यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने काही जिल्हा परिषदांच्या आधिकाऱ्यांनी ही खरेदी थांबवली आहे. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बाजारभावापेक्षा अधिक दराने डाळी आणि कडधान्ये खरेदी करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे सरकारचे मोठे नुकसान होणार असल्याचे सरकारला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी केली. ती मान्य करताना चौकशी करण्याची घोषणा विनोद तावडे यांनी केली. हाफकिनचे जळगावमधील केंद्र बंड पडण्याच्या मार्गावर आहे. मुख्याध्यापकांना महिना लाख दीड लाखाचा पगार आणि संशोधकांना ४०-५० हजार दिले जातात. त्यामुळे कोण संशोधक येतील. शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत खडसे यांन गिरीश बापट यांना धारेवर धरले. एवढेच नव्हे तर धान्याचा काळाबाजार रोखण्याच्या तुमच्या घोषणा असताना सातारा जिल्ह्य़ात धान्याचा अपहार झालाच कसा, असा जाबही बापट यांना विचारला. त्यावर हाफकिनचे केंद्र बंद होणार नाही, असे स्पष्ट करीत बापट यांनी खडसेंचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपावरूनही खडसे यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांना चार लाख पंपाचे काय झाले झाले असा सवाल केला. मुक्ताईनगर येथील ८१ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या प्रश्नावरही एकनाथ खडसे यांनी सरकारची कोंडी केली. प्रशासकीय मान्यता मिळून आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही या कामाची निविदा का काढली नाही, असा सवाल करीत पाणीपुरवठा मंत्र्यांना खडसावले. त्यावर १५ दिवसात कार्यवाही होईल. तसेच विलंबाची चौकशी करू असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले. त्यावर कोणत्याही कामाचे कार्यारंभ आदेश काढण्यासाठी या सरकारच्या काळात भेट घेऊन चिरीमिरी दिल्याशिवाय काहीच काम केले जात नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला.