सिम्बायोसिस विद्यापीठाच्या नमनाला गालबोट

सिम्बायोसिस आंतररराष्ट्रीय विद्यापीठाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी पूर्व नागपुरातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गर्दी जमविण्यासाठी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळ झाल्याने विद्यापीठाच्या नमनाला गालबोट लागले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित असताना त्यांच्यासमोर हा गोंधळ झाला.

पुण्याच्या सिम्बायोसिसच्यावतीने पूर्व नागपुरातील वाठोडा परिसरात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची निर्मिती केली जाणार असून या विद्यापीठाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी व पूर्व नागपुरातील काही वरिष्ठ नेत्यांनी कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी आणि शक्तिप्रदर्शन करण्यासाठी त्या भागातील झोपडपट्टीबहुल भागातील हजारो महिला, पुरुष आणि लहान मुलांना मोठय़ा वाहनांमधून आणले होते. त्यासाठी प्रत्येक वस्तीमध्ये सकाळीच वाहने उभी करण्यात आली आणि प्रत्येक वस्तीमधून किमान १०० ते १२५ महिला-पुरुष कार्यक्रमाला आणले जात होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी त्यांना बसविण्यासाठी जागा अपुरी पडली. मिळेल त्या जागेवर लोकांना बसविले जात होते.

विशेषत: मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी भागातील महिलांचा समावेश असताना त्यांना कुठल्या कार्यक्रमाला आलो आहे याची माहिती नसल्याचे समोर आले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत, त्या ठिकाणी शक्तिप्रदर्शन करता येणार नसल्याचे फर्मान पक्षाने काढले. त्यामुळे पूर्व नागपुरातील काही प्रभागातील इच्छुकांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे या कार्यक्रमाचा फायदा घेत वस्तीतील लोकांना संघटित करून नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात केला. मात्र, कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्याने तो अनेकांच्या अंगलट आला.

कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धीविनायक काणे यांचे भाषण सुरू असताना मागच्या भागात कार्यकर्त्यांने लोकांना फूड पॅकेटचे वितरण सुरू केले त्यामुळे अनेक लोकांनी आणि लहा मुलांनी ते मिळविण्यासाठी गर्दी केली. यामुळे कार्यक्रमात गोंधळ झाला. मुख्यमंत्र्यांसह गडकरींच्या लक्षात येताच त्यांनी पदाधिकाऱ्यांना मागे पाठविले आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला येताना अनेक इच्छुक उमेदवार स्वतच्या नावाचे फलक तयार करून ढोल ताशांच्या गजरात आणि डिजे लावत कार्यकर्त्यांंसह कार्यक्रमस्थळी आले होते. प्रभाग २७ मधील इच्छुक उमेदवार हितेंद्र चव्हाण यांनी शिकवणी वर्गाच्या विद्यार्थ्यांना डीजेच्या तालावर थिरकायला लावले. भर रस्त्यात विद्यार्थी थिरकत असल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

आचारसंहिता असताना अनेक इच्छुक उमेदवारांनी आणि पूर्व नागपुरातील काही नगरसेवकांनी स्वागताचे आणि होर्डीग आणि फलक लावले होते. मार्गावर प्रवेशद्वारावर पक्षाचे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रम नेमका विद्यापीठाच्या भूमिपूजनाचा की नेत्यांच्या जाहीर सभेचा असा प्रश्न अनेकांना पडला.