केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात रुग्णसेवेसोबतच नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही गुणगाण केले, त्यामुळे या कार्यक्रमाला पक्षीय मेळाव्याचे स्वरूप आले होते.
व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्र्यांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वानीच गत काँग्रेस राजवटीची भाजपच्या राजवटीसोबत तुलना करीत एकीकडे काँग्रेसला दूषणे दिली तर दुसरीकडे मोदींच्या कौतुकाचे पाढे वाचले. भाजपच्या दक्षिण-पश्चिम परिमंडळातर्फे शुक्रवारी येथील बी.आर. मुंडले सभागृहात महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली. शिबिरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय विधि व न्याय खात्याचे मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय पंचायतराज खात्याचे राज्यमंत्री निहालचंद मेघवाल, यांच्यासह देश आणि विदेशातील नामंवत आरोग्य चिकित्सकांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मोदी सरकार किती गतिमान पद्धतीने काम करते याचे अनेक दाखले दिले. त्यात नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या जागेची अदलाबदलीपासून तर नवी मुंबईतील विमानतळाच्या परवानग्यांचा समावेश होता. गेल्या पन्नास वर्षांत मिळाला नाही इतका निधी केंद्राने यावेळी दुष्काळाच्या काळात राज्य सरकारला दिल्याचा दावाही त्यांनी केला.
केंद्रीय विधि व न्यायमंत्री सदानंद गौडा यांनी केंद्राच्या योजनांचा पाढा वाचला. केंद्रीय पंचायत राजमंत्री निहालचंद मेघवाल यांनी मोदींसोबत गडकरींच्या विकास कामांचीही माहिती दिली. एकटे गडकरी नागपुरात हजारो कोटी रुपये खर्च करू शकतात, यावरूनच मोदी सरकारच्या विकास कामांची गती लक्षात येते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जोशी यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य शिबिरासाठी देशविदेशातून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूचा सत्कार करण्यात आला. डॉ. कांतीलाल संचेती, डॉ. तात्याराव लहाने, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे यावेळी भाषणे झाली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची संघटना फेस्कॉमतर्फे जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.
कॅन्सरच्या रुग्णांसाठी मुंबईत निवास व्यवस्था
कॅन्सरच्या रुग्णासाठी मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्यास गडकरी यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या जेएनपीटीच्या जुन्या इमारती दुरुस्त करून तेथे एकाच वेळी २०० मुले व त्यांचे पालक राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी टाटा कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या वतीने सांगण्यात आले. नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटसाठी तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आले.
गरीब रुग्ण पैशाविना उपचारापासून वंचित राहणार नाही -मुख्यमंत्री
राज्यातील एकही गरीब रुग्ण पैशाविना उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी धर्मदाय रुग्णालयांत गरिबांसाठी १० टक्के खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात गरीब रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य कक्षाच्या माध्यमातून एका वर्षांत १८० कोटी रुपये उपचारांवर खर्च करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरोग्य सेवा महागडी झाल्याने गरिबांची पंचाईत होते, त्यासाठी अशा प्रकारच्या महाआरोग्य शिबिरातून सामान्य जनतेला लाभ होत असल्याने ही शिबिरे विविध ठिकाणी आयोजित केली जातील व त्यातून गरिबांना दिलासा दिला जाईल, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ही सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
शेवटच्या दिवशी १४ हजार रुग्णांची नोंदणी
२१ तारखेपासून सुरू झालेल्या या शिबिरात हजारो रुग्णांनी आरोग्याची तपासणी करून घेतली. १५६० एमआरआय, सीटीस्कॅन करण्यात आले. ७४० रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली. शेवटच्या दिवशी म्हणजे आज १४ हजार ५०० रुग्णांनी नोंदणी केली असून त्यापैकी ५ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात येत्या दोन दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. देश-विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर या शस्त्रक्रिया करतील. शेवटचा रुग्ण तपासल्याशिवाय हे डॉक्टर नागपूर सोडणार नाही, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी यावेळी सांगितले.