भाजपचे महाआरोग्य शिबीर ; रुग्ण २ महिन्यांपासून प्रतीक्षेत

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात (दक्षिण- पश्चिम नागपूर) पक्षाकडून शहरात आरोग्य शिबीर सुरू असून, येथे साडेतीन हजारांवर रुग्णांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी काही रुग्णांवर २७ ते ३० मे दरम्यान मेडिकल, सुपरसह काही खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल. त्याकरिता मेडिकल व सुपरचे ८ शस्त्रक्रिया गृह दिल्याने येथील दोन महिन्यांपासून शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या रुग्णांची प्रतीक्षा आणखी वाढण्याचा धोका आहे.

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपूरच्या मेडिकलची ख्याती आहे. येथे महागडय़ा उपकरणांसह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील विदर्भासह शेजारच्या तीन राज्यांतून उपचाराकरिता गंभीर आजारी गटातील रुग्ण मोठय़ा संख्येने येतात. सोबत मेडिकलच्या अखत्यारित्य असलेल्या सुपरस्पेशालिटीत ह्रदय, मेंदू, किडनी प्रत्यारोपणासह इतरही अनेक विभागाच्या शस्त्रक्रिया होत असल्याने येथेही उपचार घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. मेडिकलच्या अस्थिरोग विभागात सध्या सामान्य गटातील शस्त्रक्रियेकरिता सुमारे २ महिन्यांची प्रतीक्षासूची असून रुग्णांना वेगवेगळ्या वार्डात शस्त्रक्रियेकरिता २ महिने ताटकळत रहावे लागत आहे.

गंभीर आजार गटातील शस्त्रक्रिया वेळीच करून इतरही शस्त्रक्रियांसाठी वेळेचे बंधन असल्याने ही स्थिती उद्भवल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर सुपरस्पेशालिटीत सध्या ‘ओपन हार्ट’सह गंभीर शस्त्रक्रियेसाठी दोन महिन्यांची तर मेंदूरोग विभागात शस्त्रक्रियेसाठीही जवळपास दीड महिन्यांची प्रतीक्षासूची असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. तेव्हा हे रुग्ण शस्त्रक्रिया होईस्तोवर येथील वेगवेगळ्या वार्डात ताटकळत राहतात. येथे उपचार घेणारे बहुतांश गरीब वर्गातील रुग्ण असल्याने शासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला आदेश देत या रुग्णांकरिता विशेष अभियान राबवून ही सूची शून्यावर आणण्याकरिता तातडीने विविध उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने असे न करता भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्याने नागपूरच्या दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित महाआरोग्य शिबिराकरिता नागपूरला मुंबई, पुणेसह राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची फौज शस्त्रक्रियेकरिता आणली आहे. सोबत इतरही काही खासगी रुग्णालयातील डॉक्टर शस्त्रक्रियेकरिता भाजपच्या वतीने उपलब्ध करून दिले गेले आहे. या डॉक्टरांकडून मेडिकल व सुपरच्या प्रतीक्षा यादीतील सगळ्या रुग्णांनाही दिलासा देणे अपेक्षित असताना तसे झाले नसल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.

भाजपने या शिबिरातून हजारोंना लाभ देण्याचे उल्लेखनीय प्रयत्न केले असले तरी त्यातील होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे इतरांना त्रास होऊ नये याकरिता काळजी घेण्याची जवाबदारी शासनाची आहे. परंतु त्यांच्याकडून मेडिकलच्या रुग्णांच्या गैरसोयीचा विचार न केला गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिबिरातील रुग्णांवर मेडिकलमधील ५ आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील ३ शस्त्रक्रियागृहांसह खासगीच्या काही रुग्णालयांत चार दिवस शस्त्रक्रिया होणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी मेडिकल व सुपरमधील सगळीच शस्त्रक्रिया गृह दिली गेल्याने या काळात दोन्ही शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या शस्त्रक्रिया होणार का? का रुग्णांची प्रतीक्षा यादी आणखी वाढणार नाही का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एका शस्त्रक्रिया गृहात चार टेबल!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल व सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील आठपैकी काही शस्त्रक्रियागृहात दोन ते चार टेबल ठेवून तितक्या रुग्णांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले जात आहे. वैद्यकीय नियमाला छेद देणाऱ्या या प्रकाराने काही रुग्णांसोबत अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यातच एखाद्या संसर्ग असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया झाली व त्याची लागण इतरांना झाली तर त्याला जबाबदार कोण? हाही प्रश्न याप्रसंगी उपस्थित होत आहे.

रुग्णांना त्रास होऊ देणार नाही

नागपूरला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून हजारो गरीब रुग्णांना बाह्य़रुग्ण विभागासह शस्त्रक्रियेचा लाभ होणे ही चांगली बाब आहे. या शस्त्रक्रियेसाठी मेडिकल व सुपरचे शस्त्रक्रिया गृह उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी येथील रुग्णांचीही शस्त्रक्रिया करण्याची काळजी प्रशासन घेईल. दोन्ही संस्थेतील रुग्णांना त्रास होऊ नये याकरिता प्रयत्न केले जाईल. या काळात नियमांचा भंग होणार नाही.

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)