मी आणि गडकरी नागपूरचेच सुपुत्र असल्याने या शहराकडे आमचे अधिक लक्ष असणे स्वाभाविक आहे आणि ते आम्ही देणारच, पण त्याचसोबत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मुंबईसह राज्याच्या इतर भागांचेही चित्र येत्या पाच वर्षांत पालटवून दाखवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडण़वीस यांनी रविवारी येथे दिली.

नागभूषण फाऊंडेशनतर्फे यंदाचा नागभूषण पुरस्कार फडणवीस यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रात नितीन गडकरी आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडण़वीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर नागपूरच्या आणि विदर्भाच्या विकासाकडे या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विदर्भाबाहेरील नेत्यांकडून या दोन्ही वैदर्भीय नेत्यांवर टीका केली जाते. याचा संदर्भ गडकरी यांनी त्यांच्या भाषणातून दिला. पुणे, मुंबईसह विदर्भाबाहेरील भागातील जनतेच्या मनात विदर्भाविषयी आकस निर्माण करण्याचा प्रयत्न काही माध्यमे आणि नेत्यांकडून होत आहे, हा प्रकार चुकीचा आहे. केंद्रीय मंत्री म्हणून आपण नागपूरसह राज्याच्या इतरही भागातील रस्ते विकासासाठी निधी दिला आहे, असे गडकरी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हाच धागा पकडत आपण नागपूरचे सुपुत्र असलो तरी मुंबई, पुणे, नासिक, औरंगाबादसह राज्यातील इतरही भागाचा पाच वर्षांत कायापालट करून दाखवू आणि नागपूरचा सुपुत्र राज्याचे चित्र बदलवून दाखवू शकतो, हे सिद्ध करू, असे स्पष्ट केले. आतापर्यंत विदर्भावर अन्यायच झाला. तो दूर करणे आमचे कर्तव्यच आहे, पण हे करताना आम्ही इतर भागांकडे दुर्लक्ष करणार नाही. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनीच पुलांचे जाळ उभारले. त्यांनी तेव्हा पूल बांधले नसते, तर आज दिल्लीसारखी मुंबईची स्थिती झाली असती. आमचे सरकार मुंबईत नवीन मेट्रो प्रकल्प सुरू करून ९० लाख प्रवाशांची सोय करणार आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत वाहतूक कोंडीच राहणार नाही. तेथील सागरी सेतूचा प्रश्न मार्गी लावला आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्प आम्हीच सुरू केला आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. विदर्भावर संकृचित विचारांचे संस्कार नाही, त्यामुळे आम्ही भेदभाव करणार नाही, पण विदर्भाकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

गडकरी, फडणवीसांची परस्परांवर स्तुतिसुमने

नागपुरातील भाजपचे दोन दिग्गज नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचे चित्र नेहमीच माध्यमांतून रंगविण्यात येते. गडकरी यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा मुद्दा उपस्थित करून ही केवळ माध्यमांची चर्चा आहे, प्रत्यक्षात काहीच नाही, असे स्पष्ट केले. गडकरी आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी परस्परांवर स्तुतिसुमने वाहिली. आमच्यात एकोपा आहे. भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, देवेंद्रच्या नेतृत्त्वाखाली राज्य संपूर्ण देशात चांगले काम करीत आहे, असे गडकरी म्हणाले. आपल्या राजकीय कारकीर्दीचे गडकरी हे साक्षीदार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना फायदा होतो, असे फडणवीस म्हणाले. गडकरी यांची निर्णय क्षमता, धाडसी वृत्ती आणि कमालीचा उत्साह, या गोष्टींचे आपल्याला नेहमीच कौतूक वाटत आले आहे, असे गडकरी म्हणाले.