जीवनमूल्ये, शैक्षणिक धोरण आणि संस्काराचे धडे देणाऱ्या भाजप नेत्या आणि माजी महापौर कल्पना पांडे लाच प्रकरणात अडकल्याने भाजपचा खरा चेहराच या निमित्ताने उघड झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात आघाडी उघडली असल्याचे एकीकडे चित्र निर्माण केले जात असताना दुसरीकडे त्यांच्याच शहरातील एक ज्येष्ठ महिला नेत्यावर झालेली कारवाई ही पक्षाच्या प्रतिमेला तडा देणारी ठरली आहे. पक्षात धडाडीच्या कार्यकर्त्यां म्हणून ओळख असलेल्या कल्पना पांडे विनायकराव देशमुख शाळेत शिक्षिका होत्या. शिवाय त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. वक्तृत्वावर हुकूमत, प्रत्येक गोष्टीची माहिती, राजकीय क्षेत्रात दांडगा लोकसंपर्क असल्याने पांडे यांची राजकीय कारकीर्द लवकरच भरभराटीस आली. ९८ मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी हनुमाननगर वॉर्ड महिलांसाठी खुला होता. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी पंजा चिन्ह गोठावले होते आणि भाजपची लाट होती. त्यामुळे त्या प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या आणि लागलीच दुसऱ्यावर्षी राज्यात युतीची सत्ता असताना त्यांना महापौर पद मिळाले होते. पक्षामध्ये सक्रिय झाल्यानंतर आणि नगरसेवक म्हणून त्यांनी केलेले काम बघता पक्षाने २००७ मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि दुसऱ्यांदा त्या निवडून आल्या होत्या. पक्षातील धडाडीच्या महिला कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर पक्षाने महिला कार्यकारिणीत स्थान दिले. राजनाथसिंग राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांची राष्ट्रीय महिला आघाडीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत दोनदा नगरसेवक म्हणून आणि माजी महापौर असलेल्या कल्पना पांडे यांना शैक्षणिक पातळीवर संघटनेत त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शैक्षिक परिषदेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेल्या पांडे यांची आमदार अनिल सोले यांच्या पुढाकाराने नुकतीच शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय व्हीएमव्ही महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून दोन वर्षांंपूर्वी रुजू झाल्या असून सध्या त्या अध्यापन करीत आहे. ९९-२००० मध्ये महापौर असताना शिस्त आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू पाहणाऱ्या कल्पना पांडे शिस्त, पक्षाची ध्येय धोरणे, विचार आणि संस्कार विसरल्या की काय? असे वाटायला लागले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांवरील कारवायांमुळे गत काही दिवसांपासून पक्ष अडचणीत सापडला आहे. युवा शाखेचा पदाधिकारी असलेला सुमित ठाकूर हा प्राध्यापकावरील हल्ल्याच्या प्रकरणात प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणावरून पक्षावर सर्वत्र टीका होत असताना आता पांडे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या छाप्यात अडकल्या आहेत. उत्तर भारतीयांवरील कारवायांमुळे संघ मुख्यालयीच भाजपची प्रतिमा मलीन होत आहे.