News Flash

भंडारा-गोंदियातील भाजपच्या पराभवाचे खापर फुकेंवर

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या  दारुण पराभवाचे  खापर पक्षाचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्यावर फोडण्यात येत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

पटोले यांनी मोदींना लक्ष्य करून संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक भाजपला जिंकायची होती. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला ही जागा गेल्याने भाजपला विजयाची खात्री होती. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशखेर बावनकुळे यांना निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. तसेच आमदार अनिल सोले आणि परिणय फुके यांच्याकडे महत्त्वाचे कामे देण्यात आली होती. शिवाय या मतदारसंघातील भाजपच्या पाचही आमदारांना मतांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नितीन गडकरी यांनी प्रचार सभेच्या माध्यमातून दोन्ही जिल्हे पिंजून काढले, परंतु चाळीस हजारांहून अधिक मतांच्या फरकाने भाजपचा पराभव झाला. या पराभवाचे खापर आता आमदार परिणय फुके यांच्यावर फोडण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायती समिती भाजपकडे आहे. सहापैकी पाच आमदार आहेत. गोंदिया जिल्ह्य़ात मंत्री आहे. असे असताना भाजपचे हेमंत पटले हे पराभूत होणे भाजपच्या जिव्हारी लागले आहे.

सर्वत्र यंत्रणा पाठीशी होती. प्रत्येक तालुक्यात प्रचार केला. मात्र, या मतदारसंघातील कुणबी समाज भाजपसोबत राहिला नाही. फुके कुणबी मते भाजपकडे वळण्यास असमर्थ ठरले. ते प्रचारकाळात सक्रिय नव्हते, अशी तक्रार राज्यातील एका मंत्र्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

या मतदारसंघात सर्वाधिक सुमारे चार लाख मतदार कुणबी आहेत. राष्ट्रवादीने कुणबी उमेदवार दिला होता, तर भाजपने पोवार समाजातील उमेदवार दिला होता. या पोटनिवडणुकीत स्थानिक कुणबी नेते तसेच नागपूरहून प्रचारासाठी गेलेल्या कुणबी नेत्यांनी एकजूट केली. त्याप्रमाणे फुके यांनी भाजपसाठी मतदारवर्ग आकर्षित केला नाही. त्यामुळे भाजपला येथे पराभवाची नामुष्की ओढवून घ्यावी लागली असा दावा करण्यात येत आहे.

प्रकृती चांगली नसल्यामुळे प्रचारात सक्रिय सहभाग नव्हता, परंतु दूरध्वनीवरून स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तिकडे गेलो होतो. प्रकृती बरी नसल्याने पोटनिवडणुकीसाठी परिश्रम घेण्याचा प्रश्नच येत नाही.    – परिणय फुके, आमदार, भाजप.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:06 am

Web Title: bjp in nagpur 3
Next Stories
1 नागपूर सामूहिक हत्येनं हादरलं, एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या
2 Maharashtra SSC 10th Result 2018  : नागपूर विभागाची ‘निकालपत’ घसरली
3 सत्ताधाऱ्यांना सिंहाचे नव्हे, शेळ्यांचे कळप हवेत!
Just Now!
X