सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे सरसंघचालकांना पत्र; भाजपला आश्वासनाचा विसर पडल्याची तक्रार

नागपूर : सत्तेवर येताच भगतसिंह कोश्यारी समितीच्या शिफारसी लागू करू, असे आश्वासन देणाऱ्या भाजप नेत्यांनी सत्तेवर आल्यावर

मात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या बाजूने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे टाळले, असे सांगत हे भाजप नेते निवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक करतात, अशी तक्रार करणारे पत्र सेवानिवृत्त कर्मचारी  दादा तुकाराम झोडे यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पाठवले आहे.

६७ वर्षीय झोडे राज्य विद्युत निर्मिती कंपनीतून सेवानिवृत्त झाले. मी संघ स्वयंसेवक नाही. पण मला संघाविषयी आदर आहे तसेच संघकार्याविषयी माझे चांगले मत आहे. देशातील ६८ लाख ईपीएस-९५ च्या निवृत्तीवेतनधारकांच्या व्यथा मांडण्यासाठी आपण (सरसंघचालक) योग्य व्यक्ती आहात, असे वाटल्यानेच  पत्र पाठवण्याचे धाडस केले, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सत्तेवर आल्यावर भगतसिंह कोश्यारी  समितीच्या शिफारसी ९० दिवसात लागू करू, किमान पेन्शन ३ हजार करू, त्यावर महागाई भत्ता देऊ, असे आश्वासन २०१४ मध्ये भाजप नेत्यांनी दिले होते. भाजप नेते नितीन गडकरी, हंसराज अहीर, प्रकाश जावडेकर यांनी निवृत्त कर्मचारी संघटनेच्या बैठका घेतल्या. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांनी भाजपला साथ दिली. पण केंद्रात सत्तेत आल्यावर भाजपने आश्वासन पाळले नाही. सात वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. पण, त्यांनी कोश्यारी समितीच्या शिफारसी लागू केल्या नाहीत. पेन्शनमध्ये वाढ केली नाही. संघाच्या मुशीत तयार झालेल्या भाजप नेत्यांनी वयोवृद्ध निवृत्त वेतनधारकांची फसवणूक करणे अपेक्षित नव्हते, अशी खंत झोडे यांनी व्यक्त केली आहे.

आपण (सरसंघचालक) निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व या प्रश्नात लक्ष घालून तो सोडवावा, अशी  विनंती झोडे यांनी त्यांच्या पाच पानी पत्राद्वारे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना केली आहे.