गारपीटग्रस्तांसाठी कोंढाळीत रास्ता रोको

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी काटोलचे भाजप आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी आज कोंढाळी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. आमदाराच्या या कृतीमुळे आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.

जिल्ह्य़ात रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस गारपीट झाली व त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पीकहानी झाली. काटोल, नरखेड, मौदा तालुक्यात हानीची तीव्रता अधिक आहे. मंगळवारी पालकमंत्र्यांनी काटोल-नरखेड भागाचा दौरा केला. त्यात डॉ. आशीष देशमुख सहभागी झाले होते हे विशेष.

दरम्यान, बोंडअळीमुळे पिकांना फटका बसला असताना नुकसान भरपाईतून नरखेड व काटोल तालुके वगळण्यात आले आहेत. या दोन्ही तालुक्यांचा पुन्हा समावेश करावा आणि गारपीटग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर अमरावती मार्गावरील कोंढाळी गावाजवळील रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या आणि रस्त्यावर टायर जाळण्यात आले. गावातील शेतकरी या आदोलनात सहभागी झाले होते त्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.

मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी

काटोल परिसरात अर्धा तास गारा पडल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले. कोटय़वधी रुपयांची पीकहानी झाली. एवढे होऊनही शेतक ऱ्यांची विचारपूस करण्यास मुख्यमंत्री आले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी काटोल तालुक्याला भेट द्यावी, उद्यापासून काटोल उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात आंदोलन करू, असा इशारा आशीष देशमुख यांनी दिला.

राष्ट्रवादीचा इशारा

२०१४ प्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख आणि रमेश बंग यांनी केली. काटोल व नरखेड तालुक्यासह जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. सरकारने तत्काळ मदत करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देशमुख यांनी दिला.

पीक विम्याचा फायदा कंपन्याना -तुमाने

पीक विमा हा शेतक ऱ्यांचा नव्हे तर कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीक विम्यापोटी किती शेतकऱ्यांना मदत मिळाली, असे लोकसभेत विचारले असता कृषीमंत्र्यांकडे याची माहिती नव्हती. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी तुमाने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.