• जबर मारहाणीत एकाचा मृत्यू
  • नागपूरमधील घटना; गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर शंकरनगर चौकातील क्लाऊड सेव्हन बारमध्ये भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे चिरंजीव अभिलाष आणि रोहीत यांनी बारमध्ये घातलेल्या धुमाकुळामुळे त्यांचा मित्र शुभम सुधीर महाकाळकर (२३,रा.महाल) याची लक्ष्मीभवन चौकात हत्या करण्यात आली.

या घटनेत अभिलाषसह चौघे जखमी झाले असून या प्रकरणी अभिलाष, रोहीत खोपडेसह त्याच्या ९ ते १० सहकाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न व तोडफोड, तर बारमालक सावन उर्फ सनी बम्ब्रोतवारच्या ९ ते १० सहकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रविवारी रात्री अभिलाष खोपडे, त्याचा भाऊ रोहीत, अक्षय व अभी झाडे हे क्लाऊड सेव्हन बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले. तेथे बिलावरून वेटर व मालकासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर अभिलाष व त्याच्या मित्रांनी वेटर व मालक सन्नीच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. त्यानंतर चौघेही बारबाहेर आले.

सन्नीने त्याचा भाऊ शोबीतला दूरध्वनी करून माझ्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. शोबीतने त्याचा मित्र कपिलला माहिती दिल्यावर कपील, शोबीत, सिद्धार्थ व त्याचे साथीदार बारमध्ये पोहोचले तोवर सर्व पळालेले होते. याचवेळी अभिलाषने शुभमसह अन्य मित्र व काकांना या घटनेची माहिती दिली.

शुभमसह त्याचे साथीदार तेथे पोहोचले. कपील, शोबीत याने खोपडे यांच्या कारसह बारपुढील दोन कारच्या काचा फोडल्या व नंतर लक्ष्मीभवन चौकात खोपडे बंधू व त्यांच्या मित्रांना गाठून त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी सर्व पळून गेले, पण अक्षय, शुभम त्यांच्या हाती लागले. शोबीत, कपील व त्याच्या साथीदारांनी शुभमच्या गळा व छातीवर ७-८ वार केले.

शुभम जागीच मरण पावला. दरम्यान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेक ऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

हत्या तरुणीवरून की बिलावरून?

गेल्या आठवडय़ात धरमपेठेतील लाहोरी बारजवळ तरुणीच्या छेडखानीवरून बारमालक समीर मिश्रा याने गोळीबार केला होता. क्लाऊड सेव्हनमध्येही युवतीची छेड काढल्यावरून बारमालक व अभिलाष यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली. मात्र, तरुणीची छेड काढल्याबद्दल ही घटना घडली की, बिलावरून, याची माहिती घेण्यात येत आहे, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.