काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांचा आरोप

नागपूर : मुलूंडचे भाजप आमदार दारासिंग यांचे पुत्र रणजीतसिंग यांचा पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक  (पीएमसी) बुडवण्यात मोठा आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला.

वल्लभ म्हणाले, रणजीतसिंग हे पीएमसी बँकेत संचालक आहेत. सोबतच रिअल इस्टेट कंपनी एचडीआयएलचे लेखे  संचालक आहेत. पीएमसी बँकेने एनपीए असताना कर्ज बुडव्या एचडीआयएलला हजारो कोटींचे कर्ज  दिले. त्यामुळे लाभात असलेली बँक तोटय़ात गेली.  या बँकेतील सर्व १२ संचालकांचा संबंध प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपशी आहे. त्यातील काही संचालक तर भाजपचे पदाधिकारी आहेत. एचडीआयएल कंपनीने कर्जाची रक्कम थकवली असताना हजारो कोटीचे कर्ज बँकेने त्यांना दिले. सर्वसामान्य जनतेने परिश्रमाचा पैसा मुदत ठेवीच्या रूपाने बँकेत जमा केला आणि तो पैसा अशाप्रकारे बँक संचालकाने कर्ज बुडवणाऱ्या कंपनीला दिला. त्यामुळे या सर्व संचालकांविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे.

पीएमसी बँकेमध्ये २३ सप्टेंबपर्यंत सर्व काही ठीक होते. गेल्यावर्षीचा शुद्ध लाभ १०० कोटी एवढा होता. मुदत ठेवीमध्ये १३ टक्के आणि कर्जाच्या वसुलीमध्ये १४ टक्के वाढ झाली. मात्र, २३ सप्टेंबरला अचानक पुढील सहा महिन्यात ठेवीधारक एक हजार रुपये काढू शकतात, असे निर्बंध लादण्यात आले. आरबीआयची पूर्वसूचना देणारी यंत्रणा असते. त्याअंतर्गत बँकांच्या व्यवहारावर आरबीआय लक्ष ठेवून असते. या यंत्रणेला हे का कळले नाही. जर कळले नसेल तर का कळले नाही आणि जर कळले असेल तर कोणी त्याकडे दुर्लक्ष केले, दुर्लक्ष केले तर कोणाच्या सांगण्यावरून केले, त्याचा खुलासा  होणे आवश्यक आहे. रणजीतसिंग १३ वर्षांहून अधिक काळापासून बँकेत संचालक आहेत. ज्या कंपनीला कर्ज दिले, त्या कंपनीचे स्वत:चे विमान आहे. महाराष्ट्रातील लोकांनी छोटी-छोटी बचत बँकेत जमा केली. त्याचा वापर एचडीआयएल कंपनीने विमान, यार्ड खरेदी करण्यासाठी केला. आता लोकांना स्वत:चा पैसा काढता येत नाही. हे निर्बंध त्वरित हटवण्यात यावे. तसेच गृहनिर्माण सोसायटींना त्यांचा पैसा परत करावा. बँकेच्या संचालकांना देशाबाहेर जाण्यास मनाई करावी, अशी मागणीही केली.