पालकमंत्र्यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप

नागपूर :  पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारपासून टाळेबंदीची घोषणा केली. मात्र भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसह नगरसेवकांनी टाळेबंदीला विरोध केला आहे. महापौर आणि इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्र्यांनी एकतर्फी  निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास म्हणाले, पालकमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण आहे. मी या निर्णयाचे समर्थन करत नाही. पालकमंत्र्यांनी टाळेबंदीचा एकतर्फी निर्णय घेतला. महापौरांसह नगरसेवक शहरात जनजागृती करत आहेत.  नियमांचे पालन करण्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे व्यास म्हणाले.

आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, आता कुठे टाळेबंदीतून कसेबसे लोक बाहेर येत आहेत. अशा परिस्थितीत शहरात पुन्हा टाळेबंदी करण्याची घोषणा राऊत यांनी केली. हा  जनतेवर लादलेला निर्णय आहे. पालकमंत्री स्वत: कधी रस्त्यावर उतरले नाहीत. अनेक मोठे अधिकारी कक्षात बसूनच अंमलबजावणी करताना दिसले. माजी महापौर संदीप जोशी म्हणाले, गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि नियम पाळणाºयांसाठी  पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे.

कडक कायदे करून, जनजागृती करून नासगरिकांना नियम पाळण्यास बाध्य करून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता आले असते. मात्र आपले अपयश झाकण्यासाठी सामान्यांवर टाळेबंदी लादणे, चुकीचे  असल्याचे जोशी म्हणाले.