भाजपची नगरसेवकांना तंबी; आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

एक वर्षांने देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका घेण्याबाबत हालचाली वेगाने सुरू आहेत. दुसरीकडे तिसऱ्यांदा महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपच्या निष्क्रियतेमुळे सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे. याचा फटका बसू नये म्हणून पक्षाने तयारी सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर आज भाजपने त्यांच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आठ दिवसात कामाचे अहवाल सादर करा, असे निर्देश केले. निष्क्रिय नगरसेवकांबाबत वेगळा विचार करावा लागेल, अशी तंबी देण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरातील महापालिकेत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. एक वर्ष पूर्ण झाल्याने व आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने नगरसेवकांना त्यांच्या कामाचा लेखाजोखा मागितला होता. आज पक्षाच्या गणेशपेठेतील कार्यालयात दुपारी १२ वाजता विधानसभा निहाय नगरसेवकांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ दक्षिण पश्चिम, त्यानंतर पश्चिम, उत्तर, मध्य, दक्षिण आणि शेवटी पूर्व नागपुरातील सदस्यांशी संवाद साधत प्रत्येकाकडून त्यांच्या कामाची माहिती घेतली. बुथ रचना, प्रभागातील कामे याबाबत सूचना देण्यात आल्या. जे काम करणार नाही आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या असतील त्यांच्याविषयी पक्ष वेगळा विचार करेल, अशी तंबी नगरसेवकांना देण्यात आली. याच महिन्यात विविध समित्यांचे सभापती आणि सदस्यांची आणि स्थायी समिती अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वर्षभराचा कामाचा अहवाल सात ते आठ दिवसात शहर अध्यक्षांकडे द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

राजीनाम्यासाठी दबाव

गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांना राजीनामे मागण्यात आले होते. १०९ पैकी १०६ नगरसेवकांनी ते पक्षाकडे सादर केले. राजीनामा न देणाऱ्या तीन नगरसेवकांना तत्काळ ते सादर करण्याच्या सूचना दिल्या. एक प्रकारे दबाव टाकून राजीनामे मागितले जात असल्याची ओरड नगरसेवकांची होती.

पती ‘राज’वर नाराजी

महिला नगरसेवकांचे पतीदेव प्रभागात सक्रिय असल्याबाबतच्या तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. याची दखल घेत आजच्या बैठकीत महिला नगरसेवकांना काही सूचना देण्यात आल्या. त्यांनी स्वत: प्रभागाकडे लक्ष द्यावे, जनसंपर्क वाढवावा, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, आजच्या बैठकीलाही महिला नगरसेवकांचे पती उपस्थित होते.