विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक प्रा.अनिल सोले यांच्या  ऐवजी भाजपने महापौर संदीप जोशी यांना संधी दिल्याने गडकरी यांना हा पक्षांतर्गत मोठा धक्का मानला जातो.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने गडकरी यांच्या गृहजिल्ह्य़ातच त्यांचे समर्थक चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) आणि सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) या विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारून गडकरी यांचे पंख कापले होते. त्यात आता सोले यांची भर पडली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे गेले सहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले  प्रा. अनिल सोले यांनी पुन्हा उमेदवारी मागितली होती व त्यांच्यासाठी गडकरी आग्रही होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीतही त्यांनी याबाबत सूतोवाच केल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. गडकरी यांनी स्वत: १९८९ ते २०१४ इतक्या प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्याने उमेदवार ठरवताना त्यांचा शब्द पक्षाकडून राखला जाईल, असा अंदाज होता. कारण २०१४ मध्ये गडकरी यांच्यामुळेच सोले यांना या मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. सोले यांची  कारकीर्दही उल्लेखनीय होती, शिवाय त्यांनी फॉर्च्यून फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘युथ एम्पॉवरमेन्ट समिट’ आयोजित करून सुशिक्षित तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाचा एकनिष्ठ ‘स्वयंसेवक’ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे पक्षातून त्यांना आव्हान दिले जाईल, असे चित्र नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या प्रथेप्रमाणे निवडणुकीचा उमेदवार ठरवताना पक्षाच्या प्रदेश शाखेकडून एकाच नावाची शिफारस दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली जाते. यंदा मात्र या सोले यांच्यासह संदीप जोशी यांचेही नाव पाठवण्यात आले. विशेष म्हणजे सोले यांच्यासाठी गडकरी आग्रही असतानाही हे पाऊल उचलण्यात आले.

जोशी महापौर आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. एक नवा चेहरा त्यांच्या निमित्ताने देण्यात आल्याचा दावा पक्ष वर्तुळातून केला जात असला तरी सोले यांना उमेदवारी नाकारून प्रदेश भाजपने राज्याच्या पक्षीय राजकारणात गडकरींचे महत्त्व कमी झाल्याचे संकेत दिले आहे.

संदीप जोशी यांना पक्षाने दिलेली उमेदवारी हा परिवर्तनाचा संकेत आहे. एका तरुण नेतृत्त्वाला संधी मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष हा एक परिवार असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. परिवारात सामूहिक निर्णय होत असतो. गटातटाचा विचार केला जात नाही. त्यामुळे जोशी यांच्याउमेदवारीमुळे कोणाला डावलले किंवा कोणी नाराज आहे, असा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व जण जोशी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.

– गिरीश व्यास, प्रवक्ते, आमदार, भारतीय जनता पक्ष