09 December 2019

News Flash

भाजपकडून देशमुखांना पुन्हा संधी की नवा चेहरा?

पश्चिम नागपूर विधासभा मतदारसंघ

|| राजेश्वर ठाकरे

पश्चिम नागपूर विधासभा मतदारसंघ

सलग दोन वेळा निवडणूक जिंकणारे भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांना पक्ष पुन्हा संधी देणार की, त्यांच्याऐवजी नवीन चेहरा देणार हा या मतदारसंघात उत्सुकतेचा विषय आहे. या मतदारसंघासाठी दुसरीकडे काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे प्रमुख दावेदार असले तरी पक्षातील इच्छुकांची संख्याही तेवढीच मोठी आहे.

कुणबीबहुल पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते, परंतु गेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी फार अधिक नसल्याने येथे दोन्ही पक्षांना समान संधी आहे. भाजपचा भर संघटनात्मक नेटवर्कवर असेल तर काँग्रेसची मदार पारंपरिक मतदारांवर असेल. त्यामुळे मतदारसंघातील लढत तगडी होणार आहे.

पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम नागपूरमध्ये सर्वात प्रथम म्हणजे १९९० मध्ये विनोद गुडधे पाटील या भाजपमधील बहुजन समाजातील नेत्याने कमळ फुलवले. नागपुरात भाजपने जिंकलेली ही पहिली जागा होती, हे विशेष. त्यानंतर १९९५ मध्ये पुन्हा गुडधे पाटील यांनीच येथे भाजपला यश मिळवून दिले. युतीची सत्ता असताना गुडधे पाटील राज्यमंत्री होते. पक्षाचे नेते नितीन गडकरी यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ अशा दोन वेळा येथून देवेंद्र फडणवीस विजयी झाले. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दक्षिण-पश्चिम हा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिममधून लढण्यास पसंती दिली. त्यानंतर २००९ आणि २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकर देशमुख येथून विजयी झाले.

हा कुणबी समाजाचे प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. तसेच हिंदी भाषिक, आदिवासी, दलित आणि मुस्लिमांची मतेही लक्षणीय आहे. संघटनात्मक पाठबळ आणि १५ वर्षांपासून असलेली महापालिकेची सत्ता, त्यातून निर्माण झालेली युवा कार्यकर्त्यांची सर्व समाजातील फळी हे या मतदारसंघातील भाजपचे बलस्थान आहे. पारंपरिक मते, कुणबीबहुल मतदारसंघ आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासोबत असलेली युवा कार्यकर्त्यांची फळी ही काँग्रेसची शक्ती आहे.

भाजपकडून उमेदवार बदलाची चर्चा असलेल्या मतदारसंघात पश्चिम नागपूरचा समावेश आहे. मात्र विद्यमान आमदार सुधाकर देशमुख तिसऱ्यांदा लढण्याची तयारी करीत आहेत. पक्षाने नवीन चेहरा देण्याचे ठरवले तर महापौर नंदा जिचकार, संदीप जोशी, नगरसेवक भूषण शिंगणे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. नगरसेवक सुनील अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, संजय अग्रवाल हे हिंदी भाषक नेते देखील उत्सुक आहेत.

काँग्रेसकडून शहराध्यक्ष विकास ठाकरे हे प्रबळ दावेदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ठाकरे पराभूत झाले असले तरी त्यांनी चांगली मते घेतली होती. परंतु येथे लढण्यास माजी मंत्री अनिस अहमद, नरेंद्र जिचकार, हरिश ग्वालवंशी, नितीन ग्वालवंशी हे इच्छुक आहेत. तसेच माजी आमदार डॉ. आशीष देशमुखसुद्धा पश्चिम, कमलेश चौधरी यांनाही संधी हवी आहे. पक्षातील गटबाजी ही काँग्रेस कायमच डोकेदुखी राहिली आहे. मुत्तेमवार गट विरुद्ध  इतर गट असा वाद आहे. काँग्रेसने नेते नाना पटोले यांच्याशी जवळीक असलेले जय जवान किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. बसप आणि वंचित बहुजन वंचित आघाडीने उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. बसपने नवीन कार्यकारिणी जाहीर करून कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

विधानसभा निवडणूक -२०१४ (मिळालेली मते)

  • सुधाकर देशमुख (भाजप) ८६,५००
  • विकास ठाकरे (काँग्रेस) ६०,०९८
  • अहमद कादर (बसप) १४,१९६

लोकसभा निवडणूक – २०१९ (मिळालेली मते)

  • नितीन गडकरी (भाजप) – १,०२९१६
  • नाना पटोले (काँग्रेस) – ७५,६६४

First Published on August 13, 2019 4:45 am

Web Title: bjp national congress cm devndra fadanvis
Just Now!
X