नितीन गडकरींसह १५८ प्रवाशांना मनस्ताप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह १५८ प्रवासी असलेले इंडिगोचे विमान दिल्लीकडे झेपावण्यासाठी सज्ज झाले असतानाच इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. नंतर विमान धावपट्टीवरून परत फिरवण्यात आले. अखेर गडकरी यांनी दिल्लीला जाण्याचा बेत रद्द केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर घडला.

गडकरी हे मंगळवारी सकाळी ७.५० च्या इंडिगोच्या विमानाने  (६इ ६३६) नागपूरहून दिल्लीला जाणार होते. त्यासाठी ते विमानात बसले देखील होते. विमानात १५९ प्रवासी होते. वैमानिकाने विमान धावपट्टीवर घेतल्यावर काही वेळात झेप घेणार तोच अचानक  इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाच्या लक्षात ही बाब आल्याने त्याने तातडीने विमान धावपट्टीहून परत घेतले. गडकरी यांच्यासह प्रवासी उतरले. गडकरी घरी निघून गेले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर इंजिनची दुरुस्ती करण्यात आली. प्रवाशांना विमानात बसण्यासाठी पुन्हा उद्घोषणा करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास विमान उडण्यास सज्ज झाले. परंतु पुन्हा इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हे उड्डाणच रद्द करण्यात आले. प्रवाशांना विमानतळावर प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. नंतर त्यांना बंगळुरूहून आलेल्या दुसऱ्या (६इ ५३६) विमानात बसवून दुपारी १.५३ मिनिटांनी दिल्लीकडे रवाना करण्यात आले. दरम्यान, बंगळुरूहून नागपूरला उतरून परत बंगळुरूला हे विमान जात असल्याने नागपूरहून बंगळुरूला जाणारे (६इ ७२७) हे उड्डाण रद्द करण्यात आले.  हे विमान दुपारी ४.३५ वाजता बंगळुरूला जाते. दररोज नागपूर ते दिल्ली हे विमान नागपूरहून सकाळी ७.५० निघते आणि दिल्लीत सकाळी ९.३५ वाजता पोहचते. तांत्रिक बिघाडामुळे हे उड्डाण आज होऊ शकले नाही, असे विमानतळाचे वरिष्ठ संचालक विजय मुळेकर म्हणाले.