28 September 2020

News Flash

भाजपतर्फे आज शहरात जल्लोष

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त चौकाचौकात कार्यक्रम

अयोध्येत बुधवारी राममंदिर उभारणीच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात मंगळवारी पोद्दारेश्वर राम मंदिरात विविध रंगांचे विद्युत दिवे लावण्यात आले. त्यांच्या प्रकाशाने मंदिर असे उजळून निघाले होते.   (लोकसत्ता छायाचित्र)

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त चौकाचौकात कार्यक्रम

नागपूर : अयोध्येत बुधवारी होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने भाजपने शहरातील ३०० ठिकाणी रामधून व महाआरती करण्याचे ठरवले आहे. हा ऐतिहासिक दिवस असून या दिवशी नागरिकांनी दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही पक्षातर्फे करण्यात आले आहे.

अयोध्येत अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर बुधवारी श्रीरामाच्या मंदिराचे भूमिपूजन होत आहे. त्यानिमित्त भाजप देशभर जल्लोष साजरा करणार आहे. भाजपच्या शहर शाखेतर्फेही यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पक्षाचे शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, चौकाचौकात अयोध्येतील मंदिराचे चित्र साकारण्यात येणार आहे. ३०० ठिकाणी राम धून वाजवून प्रसाद वितरण केले जाईल. सायंकाळी घरी दीप पेटवले जातील. आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला जाईल. पक्षाचे सर्व नगरसेवक, विविध आघाडय़ांचे पदाधिकारी, श्रीरामाचे पूजन त्यांच्या भागात करणार आहेत. सकाळपासून शहरातील या कार्यक्रमात पक्षाच्या सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

घरोघरी रोषणाईचे आवाहन

५ ऑगस्ट रोजी रामभक्तांनी आपापल्या घरावर रोषणाई करावी, असे आवाहन भारतीय मजदूर संघाने केली आहे. भामसंचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. के. सजीनारायण आणि राष्ट्रीय सरचिटणीस विर्जेस उपाध्याय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रव्यापी कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

कारसेवक म्हणून गेलेल्या लाखो हजारो कामगारांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा व्हावा, असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख  सुरेश चौधरी यांनी केले.

संस्कार भारतीचा रांगोळी आनंदोत्सव

संस्कार भारतीतर्फे विदर्भात सर्वत्र रांगोळी काढून राम मंदिर भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त करण्यात येणार आहे. ५ ऑगस्टला सर्वानी सकाळी आपल्या घरापुढे, मंदिर परिसरात, सार्वजनिक ठिकाणी ‘श्रीराम‘ या संकल्पनेवर आधारित रांगोळी काढावी व त्याचे फोटो नाव, पत्त्यासह ९४०३९३७०९५, ८८८८२००६४६, ९९७०७३४४३७ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन संस्कार भारतीने केले आहे. सर्वोत्कृष्ट ११ रांगोळ्यांना  ११ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती विदर्भ संस्कार भारतीच्या अध्यक्ष प्रा. कमलताई भोंडे यांनी दिली.

पोलिसांचा चोखबंदोबस्त

भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त आखण्यात आला आहे. उद्या बुधवारी पोलीस शिपायापासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत सर्व अधिकारी रस्त्यावर असतील. पोलीस आयुक्त  डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. उद्या रस्त्यावर जवळपास तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त सांभाळतील. संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्यास संबंधितांना ताब्यात घेण्याचे आदेश ठाणेदारांना देण्यात आले आहेत.

५०० किलो लाडू वाटणार

पूर्व नागपूरमधील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्यकर्ते ५०० किलो लाडू वाटणार आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाडू तयार करण्याची प्रक्रिया आवश्यक शारीरिक अंतर ठेवून केली जात आहे, असे खोपडे यांनी कळवले आहे.

कारसेवक म्हणतात, ऐतिहासिक क्षण

प्रभूरामचंद्राची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत गुरुवारी होणारे राममंदिराचे भूमिपूजन प्रत्येक कारसेवकांसाठी आनंदाचा क्षण आणि हा दिवस ऐतिहासिक असणार आहे, अशी प्रतिक्रिया ६ डिसेंबरला अयोध्येत कारसेवेसाठी गेलेल्या नागपुरातील कारसेवकांनी व्यक्त केली.अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक वर्षे लढा दिला. तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येत जमलेल्या कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. त्यानंतर तेथे मंदिर व्हावे म्हणून अनेक वर्षे गेली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मंदिर उभारणीच्या मार्गातील अडथळे दूर झाले. ५ ऑगस्टला खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे नागपुरातील कारसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  सहकार भारतीचे विदर्भ सरचिटणीस विवेक जुगादे हे १९९२ मध्ये अयोध्येत गेले होते. ते म्हणाले रामभक्तांसाठी ५ ऑगस्टचा दिवस ऐतिहासिक आहे. कारसेवकांच्या संघर्षांतून मंदिराची संकल्पपूर्ती होत आहे याचा आनंद आहे. केळीबागमधील सुभाष मुंजे यांनी अयोध्येतील राममंदिर आंदोलनात सहभाग घेतला होता. राममंदिराची उभारणी हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. त्याचे काम बुधवारपासून सुरू होत असल्याचा आनंद आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत तितरे म्हणाले, रामंदिरासाठी अनेकांनी प्राण दिले. लाठय़ा-काठय़ा झेलल्या. या संघर्षांतून मंदिराची निर्मिती होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 1:27 am

Web Title: bjp organised programme at various places on ram mandir bhumi pujan occasion zws 70
Next Stories
1 गोरेवाडय़ातील वाघ महाराजबागेत येणार
2 अयोध्येत आनंदोत्सव, रामटेकच्या राममंदिराकडे मात्र दुर्लक्ष
3 स्वाधार योजनेचा १०० कोटींचा निधी रखडला
Just Now!
X