राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीमुळे नाराज असणाऱ्यांची संख्या भारतीय जनता पक्षात  सातत्याने वाढत चालली असून पक्षाचे आमदार आशीष देशमुख यांचे वक्तव्य हा त्याचाच परिपाक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पक्षातील आपल्या राजकीय विरोधकांना पद्धतशीरपणे संपवण्याची फडणवीस यांची राजकीय खेळी एकनाथ खडसे यांच्यावर आलेल्या राजकीय विजनवासामुळे पक्षात सर्व परिचित आहे.  नागपुरातही आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी गडकरींचे नाव जाहीरपणे पुढे केल्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. मुख्यमंत्र्यांना आव्हान देणाऱ्यांची राजकीय कोंडी केल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाला थेट आव्हान देण्याची  हिम्मत कोणी दाखवत नसले तरी त्यांच्या विषयी नाराजी वाढू लागल्याचे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पक्षाचे युवा आमदार आशीष देशमुख यांनी सोमवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याचे नेतृत्व करावे, असे जाहीर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाचे संरक्षण मंत्रीपद देण्याचा संदर्भ यामागे होता, असा दावा देशमुख करीत असले तरी त्यांनी केलेल्या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची कल्पना त्यांना नसावी यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाहीत. मुंडे यांनी राज्याचे नेतृत्त्व करावे असे म्हणणे याचाच दुसरा अर्थ फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर अविश्वास असा होतो, अशी चर्चा आता भाजपमध्ये सुरू झाली आहे. मुंडे यांनीही यापूर्वी ‘मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे’ असे वक्तव्य केले होते. देशमुख यांनी यावर शिक्कामोर्तब करून एकप्रकारे मुंडे यांना नेतृत्वासाठी पाठिंबाच जाहीर केला आहे.

यापूर्वीही आशीष देशमुख यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक हिवाळी अधिवेशन काळात नागपुरात घेतली होती. सभागृहात या मुद्यावर सरकारची विरोधकांनी कोंडी केली असताना त्यानांच या बैठकीत बोलवून देशमुख यांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्याआधी त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर राजीनामा देण्याची तयारी दर्शवून पक्षीय भूमिकेपेक्षा वेगळा सूर आळवला होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फडणवीस तयार नसताना देशमुख यांनी याच मागणीसाठी त्यांच्या मतदारसंघात आंदोलन केले होते व कर्जमाफी जाहीर झाल्यावर त्याचे श्रेयही घेतले होते. काटोल विधानसभा मतदारसंघात काका अनिल देशमुख यांचा पराभव करून प्रथमच विधानसभेत पोहोचलेले आशीष देशमुख यांनी यापूर्वीही अनेक वेळा पक्षाची कोंडी करणारी भूमिका घेतली आहे. पक्षाने मात्र त्याची दखल न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे महत्त्व कमी करण्याचे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे.

पटोले यांनी थेट मोंदींवरच हल्लाबोल करून त्यांच्यातील असंतोषाला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतरही देशमुख यांनी मुंडेंच्या निमित्ताने थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनीही हलबांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप विरोधी नारे लागले होते. हा सर्व घटनाक्रम बघता भाजपची वाटचालही आता काँग्रेसच्या दिशेने होत असल्याचे दिसू लागले आहे.