नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर  विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने यंदा विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांच्या ऐवजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, महाविकास विकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत विदर्भवाद्यांनी उडी घेतली असून त्यांच्यातर्फे  नितीन रोंघे रिंगणात उतरणार आहेत.

हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून या पक्षाच्या उमेदवाराकडे सर्वाचे लक्ष लागले होते. प्रा. अनिल सोले आणि संदीप जोशी या दोघांमध्ये  चुरस होती. पक्षश्रेष्ठींनी जोशी यांच्या बाजूने कौल दिला. आज त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोशा के ला. पन्नास वर्षीय संदीप जोशी २००२ पासून नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग दोन वर्षे सांभाळले. विद्यमान महापौर आहेत.  विविध सामाजिक संस्थांशीही ते जुळले असून त्यांच्या युवा झेप प्रतिष्ठानतर्फे  दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची भाजपमध्ये ओळख आहे. एका युवा नेत्याला भाजपने संधी दिली आहे. जोशी यांचे कार्यक्षेत्र हे नागपूरपुरतेच मर्यादित असून हा मतदारसंघ नागपूरसह सहा जिल्ह्य़ांचे  प्रतिनिधित्व करतो त्यामुळे त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचे नाव निश्चित झाले आहेत. ते सोमवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने ते आता गुरुवारी अर्ज भरणार असल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. अर्ज भरताना महाविकास आघाडीतील  तीनही पक्षांचे नेते उपस्थित राहावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.  या निवडणुकीत प्रथमच विदर्भवाद्यांनी उडी घेतली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे उमेदवार म्हणून नितीन रोंघे यांनी त्यांची उमेदवारी सोमवारी जाहीर के ली. आपणास सर्व विदर्भवादी संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी के ला.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी  शिवाजी डी. सोनसरे यांनी अर्ज दाखल के ला. आतापर्यंत
एकूण ५९ लोकांनी एकू ण ७३ उमेदवारी अर्जाची उचल के ली. १२ तारीख अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

विदर्भातील पदवीधरांसाठी मैदानात – नितीन रोंघे

महाराष्ट्रात विदर्भ प्रदेश समाविष्ट करताना देण्यात आलेली आश्वासने  काँग्रेस आणि भाजप सरकारने पाळली नाही, त्यामुळे या भागावर अन्याय झाला आहे. नागपूर करारानुसार पदभरती के ली जात नाही. या भागातील पदवीधर तरुण बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे नितीन रोंघे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  रोंघे स्वत: कट्टर विदर्भवादी आणि  उच्चशिक्षित आहेत. विदर्भ राज्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

मतदानासाठी नैमित्तिक रजा

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.  ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमत्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

जाहिरात फलक काढण्याचे आदेश

निवडणूक आचारसंहितेचा भाग म्हणून सर्व शासकीय कार्यालये व परिसरातील  जाहिराती आणि राजकीय पक्षांचे झेंडे काढून टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  रवींद्र ठाकरे यांनी  दिले.  रेल्वे व बसस्थानक, विमानतळ, रेल्वे पूल, रस्ते, शासकीय बसेस, टेलिफोन व विजेचे खांब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीवर लावण्यात आलेले जाहिरात फलक काढावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.